विशेष प्रतिनिधी, मुंबई
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय गेम शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. यातून केवळ मनोरंजनच होत नाही तर बऱ्याच प्रकारची माहितीही मिळते. आणि या सर्वांवर कळस म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक. अर्थात बिग बी अमिताभ बच्चन, हे कोणीही मान्य करेल. ही एवढी प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे, पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज घुमणार आहे. केबीसीचा तेरावा सीझन १० मे पासून सोनी टीव्हीवर सुरू होणार आहे.
तुम्हाला जर या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या शो साठी नोंदणीची प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. सोनी टीव्हीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका प्रोमोच्या सहाय्याने याबाबतची घोषणा केली आहे. या प्रोमोत अमिताभ बच्चन म्हणतात, ‘‘देवीयों और सज्जनों, कमर कस लीजिए, क्योंकी १० मई से शुरू हो रहे है मेरे सवाल और केबीसीका रजिस्ट्रेशन.’’ सोमवार, १० मे रोजी रात्री ९ वाजल्यापासून अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांना सुरुवात होणार आहे.
