इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहे. अग्निहोत्रीविरुद्ध मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. अग्निहोत्रींचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात त्यांनी भोपाळीचा अर्थ समलैंगिक असा केला होता.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणाले होते की, “मी भोपाळमध्ये मोठा झालो. पण मी भोपाळी नाही. कारण भोपाळीचा अर्थ वेगळा आहे, तो मी तुम्हाला कधीतरी खाजगीत समजावून सांगेन. भोपाळी म्हणजे तो होमो म्हणजेच समलैंगिक असा आहे. नवाबीचा शौक असणारा आहे
विवेक अग्निहोत्री यांच्या या विधानावर काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी दिग्विजय सिंह यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, “विवेक अग्निहोत्रीजी, हा तुमचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. तो सामान्य भोपाळ रहिवासी नाही. मी अनेक वर्षांपासून भोपाळ आणि भोपाळींच्या संपर्कात आहे पण मला हा अनुभव कधीच आला नाही. आपल्यावर आपण राहत असलेल्या संगतीचा प्रभाव पडत असतो.”
दिग्विजय सिंग यांचा मुलगा जयवर्धन सिंग यांनीही ट्विटरवर अग्निहोत्रींच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. “स्वस्त लोकप्रियता आणि पैशाच्या लोभामुळे त्यांचे डोके फिरले आहे. आपल्या राज्याच्या राजधानीबद्दलची ही टिप्पणी अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्यांनी ताबडतोब माफी मागावी. आता आपले गृहमंत्री अग्निहोत्रींवर एफआयआर नोंदवणार का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेस नेते सुभाष कुमार यांनीही विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटरवरील विधानावर आक्षेप घेतला आणि लिहिले की “भोपालवासियांवर केलेल्या या घृणास्पद टिप्पणीबद्दल विवेक अग्निहोत्रीला ताबडतोब अटक करावी! हा लाखो भोपाळवासीयांचा अपमान आहे.”
आता हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आहे. विवेक अग्निहोत्रीवर कारवाई होते का, विवेक अग्निहोत्री त्यांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात हे येत्या काळात बघायला मिळेल. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची देशभर चर्चा होत आहे. कमी बजेटच्या या चित्रपटाने दोनशे कोटींचा टप्पा पार केला आहे.