इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अयोध्येप्रमाणे ज्ञानवापी मशिदीचा नकाशा तयार करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त आयुक्तांच्या सर्वेक्षणामध्ये समोर येणारे तथ्य आणि चहू बाजूच्या सीमेनुसार नकाशा तयार करण्या्ची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या नकाशामध्ये वर्तमान तसेच भूतकाळातील नोंदी असतील. नकाशा तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्हीडीएच्या दोन ड्राफ्टमनची नियुक्ती केली आहे. दोन्ही ड्राफ्टमन दररोज एक-एक बिंदूचा अहवाल तयार करणार आहेत.
ज्ञानवापी प्रकरणाचा संबंध आता अयोध्या प्रकरणाशी जोडला जात आहे. अयोध्या प्रकरणात सुरुवातीला सर्वेक्षण झाले होते. ज्ञानवापी प्रकरणातील पक्षकार आणि वकील अयोध्या प्रकरणात झालेल्या कार्यवाहीचा अभ्यास सध्याच्या संदर्भात करत आहेत. सर्वेक्षणादरम्यान नकाशा बनवण्याची गरज असल्याचे न्यायलयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांनी म्हटले आहे.
अयोध्या प्रकरणात फैजाबाद दिवाणी न्यायालयाने १ एप्रिल १९५० रोजी वादग्रस्त स्थळाचा नकाशा तयार करण्यासाठी न्यायालय आयुक्तांची नियुक्ती केली होती. नंतर भारतीय पुरातत्व विभागाने याच नकाशाच्या आधारावर खोदकाम केले होते. या संपूर्ण प्रकरणात हा नकाशा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध सुनावणीत पुरावा म्हणून सादर करण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात नकाशाची चर्चा झाली होती. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि अयोध्या प्रकरणातील हिंदू पक्षकारांचे वकील हरिशंकर जैन यांनीसुद्धा या नकाशाला दुजोरा दिला आहे. असे सर्वेक्षण साधारण सर्वेक्षणाच्या श्रेणीत येत असले तरी एखाद्या प्रकरणातील दाव्यात असे पुरावे महत्त्वाचे आणि अनेक वेळा निर्णायक सिद्ध होतात, असे ते सांगतात.
सूत्रांच्या माहितीनुसार, नकाशा तयार करण्यासाठी जीएसआय मुख्यालयातून सर्व डेटा घेतला जात आहे. जीएसआय नकाशा सध्याच्या स्थळावरील चहू बाजूच्या सीमेवर ठेवून नकाशा तयार केला जाणार आहे. तर ज्ञानवापी मशिदीशी संबंधित नकाशाची माहिती विकास प्राधिकरणाकडून मागविण्यात आली आहे.
वरिष्ठ वकील हरिशंकर जैन सांगतात, की अयोध्या आणि ज्ञानवापी प्रकरण वेगवेगळे आहेत. अयोध्येत अनेक दिवस करण्यात आलेल्या सर्वेक्षण आणि खोदकामानंतर मिळालेले पुरावे हिंदू पक्षकारांनी दिलेल्या पुराव्याशी जुळत होते. येथे तर पहिल्यांदाच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मिळालेले पुरावे हिंदू पक्षकारांच्या दाव्याला दुजोरा देतात. तिसऱ्या दिवशी सर्वेक्षण झाल्यानंतर सर्व स्थिती स्पष्ट होणार आहे.