मुंबई – सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपतीच्या १३ व्या सिझनचा पहिला करोडपती लाभला आहे. हिमानी बुंदेला नव्या करोडपती झाल्याचे एका प्रोमोमध्ये दाखविण्यात आले आहे. त्यानंतर त्या ७ कोटीच्या प्रश्नासाठी त्यांनी सर्व जिंकलेली रक्कम पणाला लावली आहे. विशेष म्हणजे हिमानी या दृष्टिहीन आहेत. आपल्या खेळाने त्यांनी केवळ अमिताभ बच्चन यांचेच नाही, तर केबीसीच्या सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
एक कोटी जिंकल्यानंतर घेतली जोखीम
केबीसीचा नवीन प्रोमो सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हिमानी बुंदेला यांनी १५ व्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिला आणि अमिताभ यांनी त्यांना १ कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचे दाखविले आहे. त्यानंतर हिमानी १६ व्या प्रश्नासाठी खेळतात. तो जिंकल्यानंतर त्या सात कोटी रुपये जिंकू शकतात. उत्तर देण्यापूर्वी त्या अमिताभ यांना ‘भीती वाटत आहे. पण असे वाटत आहे की उत्तर हेच आहे,’ असे म्हणत आहे.
…तर देवाची इच्छा
आणखी एका प्रोमोमध्ये हिमानी आत्मविश्वासाने १६ व्या प्रश्नाचे उत्तर देताना दाखविण्यात आले आहे. अमिताभ त्यांना विचारतात की, ‘तुम्ही उत्तरावर कायम आहात का?’ त्यावर त्या म्हणातात की, ‘मी खाली आले तर देवाची इच्छा असेल’. दृष्टिहीन मुलांमध्ये जागृती करण्याचा उद्देश असल्याचे सोनी टीव्हीने त्यांना कार्यक्रमात आणण्यापूर्वी म्हटले होते.