इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकमधील उडुपी येथे एका खासगी पॅरामेडिकल महाविद्यालयात दहा दिवसांपूर्वीच्या वॉशरूम केस प्रकरणातील तीन आरोपींना अखेर जामीन मिळाला आहे. या घटनेबद्दल संपूर्ण देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाला जातीय रंग देण्याचाही प्रयत्न झाला, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाईट प्रकार घडला नाही.
वॉशरूम केस प्रकरणात आरोपी आणि महाविद्यालयाच्या विरोधात महिलांनी जोरदार निदर्शने केली. त्याशिवाय सोशल मिडियावर मात्र हे प्रकरण जास्त गाजले. भाजप आणि काँग्रेसने एकमेकांच्या विरोधात हत्यार म्हणून याचा वापर केला. काँग्रेसने भाजपवर टिका केली असता भाजप नेत्या शकुंतला यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये आक्षेपार्ह भाषा असल्यामुळे पोलिसांनी तातडीने शकुंतला यांना अटक केली. या घटनेतील तीन मुख्य आरोपी मुलींना न्यायालयातून जामीन मिळाला आहे. वॉशरूम केसमधील कथित व्हिडियोच्या प्रकरणात या तिन्ही मुलींना महाविद्यालयाने आधीच निलंबित केले आहे. २५ जुलैला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी न्यायालयापुढे आपला गुन्हा कबूल केला होता.
प्रसाधन गृहातील व्हिडियो व्हायरल
उडुपीच्या महाविद्यालयात १८ जुलैला आरोपी मुलींनी इतर काही मुलींचे प्रसाधनगृहातील व्हिडियो व्हायरल केले होते. त्यांनी हे व्हिडियो युट्यूब चॅनलवर अपलोड केले होते. ही घटना १८ जुलैला घडली आणि या प्रकरणात २५ जुलै रोजी एफआयआर दाखल करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उडुपी येथील महाविद्यालयातल्या प्रसाधान गृहातल्या मुलींचे कथित व्हिडीओ व्हायरल करण्यात आले होते. या प्रकरणात कलम ५०९, २०४, १७५, ३४ आणि ६६ (ई) या अन्वये गु्न्हा दाखल करण्यात आला.
धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न
वॉशरुममधला तो कथित व्हिडीओ एका युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ एका व्यक्तीने ट्विटही केला. तर या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न झाला. पोलिसांनी मात्र या प्रकरणातल्या अफवांपासून सावध राहा असं आवाहन केलं आहे.