नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या ताब्यात राहण्यासाठी शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. भाजपने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबविले आणि ते यशस्वी झाले आहे. आता याच पद्धतीने कर्नाटकातही ऑपरेशन लोटस राबविले जात असल्याची चर्चा आङे. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही महिनाभरात मोठी उलथापालथ होईल, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. तर, आता जास्त वेळ लागणार नाही. कर्नाटकमध्ये काहीही होऊ शकते, असे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांनीही म्हटले आहे. त्यामुळे आणखीनच चर्चांना उधाण आले आहे.
कोण काय म्हणाले
१: माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी – सोमवारी (३ जुलै) – ‘महाराष्ट्रातील धक्कादायक घडामोडींनंतर मला भीती वाटते की कर्नाटकात अजित पवार म्हणून कोण उदयास येईल?’ त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. काँग्रेसचे सरकार वर्षभरात पडेल. इथे अजित पवार कोण असतील हे मी सांगणार नाही… पण ते लवकरच होईल.
२: माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा – मंगळवारी (४ जुलै) – ‘एचडी कुमारस्वामी जे काही बोलत आहेत ते अगदी खरे आहे आणि मला त्यांच्या विधानाचे समर्थन करायचे आहे. कुमारस्वामी आणि आम्ही भविष्यात एकत्र लढू.
३: कुमारस्वामी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘मला विशेष कोणाचेही नाव घ्यायचे नाही. (कर्नाटकात) काहीही होऊ शकते. जास्त वेळ लागणार नाही. बहुधा ते या वर्षाच्या शेवटी किंवा लोकसभा निवडणुकीनंतर होईल. आम्हाला वाट पहावी लागेल.
४: बीएस येडियुरप्पा यांनी भाजप-जेडीएस युतीच्या अटकळांना चालना देणार्या त्यांच्या विधानानंतर लगेचच मीडियामध्ये आणखी एक विधान केले. त्यांनी स्पष्ट केले की, “आमच्या केंद्रीय नेतृत्वाने परवानगी दिली तरच मी एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत कर्नाटकातील भ्रष्ट काँग्रेस सरकारविरोधात लढण्यास तयार आहे.”
आकडे काय सांगतात
कर्नाटक विधानसभेच्या एकूण जागा २२४ आहेत. बहुमतासाठी ११३ आमदारांची गरज आहे. सध्या भाजपचे ६६ आणि जेडीएसचे १९ आमदार आहेत. दोघांची बेरीज केली तर ८५ एवढीच संख्या होते. म्हणजे, बहुमताच्या ११३ या आकड्यापेक्षा २८ ने कमी आहे. त्यामुळे भाजप आणि जेडीएसची युती झाली तरी काँग्रेसच्या सरकारला विशेष धोका नाही. मात्र, काँग्रेसचे आमदार फोडण्यात आले किंवा काँग्रेसमधूनच मोठे बंड झाले तर काहीही होऊ शकते.
तरीही चर्चा का होतेय?
कुमारस्वामी आणि येडियुरप्पा दोघेही महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे कर्नाटकात काँग्रेसमध्ये फूट पडल्याचा दावा करत आहेत. असे काही झाले तर राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मात्र, संख्येच्या बाबतीत ते महाराष्ट्रापेक्षा कठीण असेल. असे जाणकारांचे मत आहे. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकात बंडखोरी करण्याचे निश्चित झाले तर किमान ९० आमदारांना बंडखोरी करावे लागेल. तरच बंडखोर गटाचे आमदार पक्षांतरविरोधी कायद्यातून सुटू शकतील.
२०१८मध्ये काय झाले होते
२०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएस युतीचे सरकार स्थापन झाले होते. कुमारस्वामी राज्याचे मुख्यमंत्री झाले. वर्षभरानंतर काँग्रेस आणि जेडीएसच्या अनेक आमदारांनी बंड केले. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यामुळे कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले. यानंतर कुमारस्वामी यांना राजीनामा द्यावा लागला. आणि राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले. बंडखोरांनी नंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. सर्वाधिक जिंकले. यासोबतच राज्यात भाजपचे सरकार अबाधित राहिले.
यावेळी असे काही व्हायचे असेल तर बहुमताचा आकडा किमान ८९ वर यावा लागेल. कारण काँग्रेस सोडून इतर सर्व पक्षांच्या आमदारांची संख्या 89 आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा काँग्रेसचे किमान 58 आमदार अफनी विधानसभेतून राजीनामा देतील.