बंगळुरू – देशातील काही नेते त्यांच्या कामापेक्षा बेताल वक्तव्यांनीच प्रसिद्ध असतात. या नेत्यांमध्ये कर्नाटकचे अन्न आणि नागरी पुरवठामत्री उमेश कट्टी यांचा समावेश झाला आहे. एका असंवेदनशील वक्तव्यामुळे ते मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले आहेत. अन्नधान्य वितरण प्रणालीद्वारे तांदळाचा साठा वाढवावा, अशी मागणी एका शेतकऱ्याने केल्यानंतर कट्टी म्हणाले की, त्यापेक्षा तुम्ही मरून जा. या बेताल वक्तव्यानंतर देशभरात संताप व्यक्त असून कट्टी यांच्या राजीनामाची मागणी केली जात आहे.
उत्तर कर्नाटकमधील गडग येथील शेतकरी कार्यकर्ता ईश्वर यांनी बुधवारी कट्टी यांना दूरध्वनी केला. लॉकडाउनमुळे हजारो लोक बेरोजगार झाल्यामुळे एका महिन्यात दोन किलो तांदळावर कोणी कसे जगू शकतो, अशी विचारणा ईश्वर यांनी कट्टी यांना केली. त्यावर मंत्री कट्टी म्हणाले, मे आणि जूनमध्ये केंद्र सरकार पाच किलो धान्य देणार आहे. पण तोपर्यंत लोकांनी उपवास करायचा का असा सवाल ईश्वर यांनी केला. त्यावर कट्टी म्हणाले, त्यापेक्षा तुम्ही मरून जा. तांदळाचा व्यवसाय करणे बंद करा, मला पुन्हा फोन करू नका.
कट्टी यांनी नंतर आपले वक्तव्य मागे घेत माफी मागितली. प्रत्येकाने समृद्ध आयुष्य जगावे. कोणाचाही मृत्यू होऊ नये, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. कोणत्याही मंत्र्याने अशा प्रकारचे वक्तव्य करू नये, असे म्हणत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने निवेदन जारी केले. त्यांनी कट्टी यांना चांगलेच फटकारले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कट्टी यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.