इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकसह भारताच्या विविध भागात हिजाबवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता जागतिक दहशतवादी संघटना अल – कायदानेही प्रवेश केला आहे. मंगळवारी अल-कायदाचा नेता अयमान अल-जवाहिरीने भारतीय मुस्लिमांना या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास प्रोत्साहित केले आहे.
अल कायदाच्या अधिकृत शबाब मीडियाने जारी केलेल्या आणि SITE इंटेलिजेंस ग्रुपने सत्यापित केलेल्या नऊ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, जवाहिरीने कर्नाटकातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी मुस्कान खानचे कौतुक केले. दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या जागी जवाहिरीने अल कायदाचे नेतृत्व स्वीकारले आहे. विशेष म्हणजे, हिजाब प्रकरणात मुस्कान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिने हिजाब घालून कॉलेजमध्ये प्रवेश केला होता आणि त्याचवेळी भगवी टोपी घालून “जय श्री राम” चा जयघोष करत असलेल्या ग्रुपसमोर निषेध केला होता. ‘अल्लाह हू अकबर’च्या घोषणा तिने दिल्या होत्या.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अल कायदाने ‘ग्रेट वुमन ऑफ इंडिया’ या शीर्षकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये जवाहिरी मुस्कान खानच्या स्तुतीसाठी लिहिलेली कविता वाचताना दिसत आहे. जिहादी दहशतवाद्याने सांगितले की, व्हिडिओ आणि सोशल मीडियावरून मला मुस्कान खानबद्दल माहिती मिळाली आणि तिच्या कृतीने ही संघटना इतकी प्रभावित झाली आहे की तिच्या स्तुतीसाठी एक कविता लिहिण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
कविता वाचल्यानंतर जवाहिरीने पाकिस्तान आणि बांगलादेश तसेच हिजाबवर बंदी घालणाऱ्या देशांवर हल्ला केला. हे देश पश्चिमांचे मित्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा जवाहिरीचा नोव्हेंबरनंतर आलेला पहिला व्हिडिओ आहे आणि त्यात एक मोस्ट वॉन्टेड जिहादी दहशतवादी केवळ जिवंतच नाही, तर मुस्कान खानच्या प्रकरणामुळे समकालीन घडामोडींमध्ये सक्रियपणे गुंतलेला दिसून येत आहे. २०२० मध्ये, जवाहिरीचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याची नोंद करण्यात आली होती, परंतु काही महिन्यांनंतर तो जिवंत असल्याचा व्हिडिओ समोर आला. तो अफगाणिस्तानात कुठेतरी राहत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.