इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काळ बदलला तशी नात्यांची प्रायोरिटी बदलली. पूर्वी केवळ आई – वडील आणि आपले कुटुंब हेच सर्वस्व असायचे. काळाच्या ओघात सगळेच स्वतंत्र झाले. मोठी कुटुंबे छोटी झाली, सुबत्ता आली. पुढे जाऊन वाद नकोत म्हणून लग्नानंतर मुले वेगळी राहू लागली. क्वचित आई – वडील स्वतः देखील एकटं राहायचा पर्याय स्वीकारू लागले. पण अशाप्रकारे वेगळं राहाणं म्हणजे आई – वडिलांप्रती आपलं कर्तव्य संपणं का? तर नाही. आई – वडिलांपासून वेगळं राहणं म्हणजे त्यांची जबाबदारी झटकणं नाही. तर दूर राहूनही त्यांची जबाबदारी घेणं म्हणजे कर्तव्य निभावणं. नेमकी हीच गोष्ट कर्नाटक उच्च न्यायालयाने दोन मुलांना सांगितली.
काय आहे प्रकरण?
वडिलांमागे एकाकी आयुष्य जगणाऱ्या आईला खर्चापोटी पैसे देण्यास मुलांनी नकार दिल्याने या आईला कायद्याची मदत घेणे भाग पडले. त्यावेळी न्यायालयाने या दोन मुलांचे कान उपटले. वेंकटम्मा असे या आईचे नाव असून त्या ८४ वर्षांच्या आहेत. त्यांना दोन मुले. खरं तर या दोघांनी दरमहा प्रत्येकी ५ असे दर महिना १० हजार रुपये आईला खर्च करण्यासाठी द्यावेत, असे आदेश म्हैसूर सहायक आयुक्तांनी २०१९ मध्येच दिले हाेते. मात्र, मुलांना ही रक्कम जास्त वाटली आणि त्यांनी उपायुक्तांकडे दाद मागितली. मात्र, तेव्हा मुलांनाच चार गोष्टी सांगत उपायुक्तांनी ही दरमहा रक्कम वाढवून प्रत्येकी १० हजार रुपये केली. त्याविराेधात दाेघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. उच्च न्यायालयाने देखील आईसाठी एवढा पैसा खर्च करू शकत नाही, हे योग्य नसल्याचे त्यांना सांगितले. आणि अशी याचिका दाखल केल्यावरून ५ हजार रुपयांचा दंडही ठाेठावला.
भावांचे म्हणणे काय?
आईला पैसे देण्याएवढे आमचे उत्पन्न नसल्याचा या दोन मुलांचा दावा होता. त्यावर न्या. कृष्ण दीक्षित यांच्या एकलपीठाने निर्णय देत म्हटले की, मुले गरीब असल्याचा त्यांचा दावा चुकीचा आहे. जर ते आपल्या पत्नीची देखभाल करू शकत असतील तर आईची देखभालही नक्कीच करू शकतात. पुरुष जसा पत्नीची काळजी घेण्यासाठी बांधील असतो, तसाच तो आईची काळजी घेण्यासाठी देखील बांधील असतो, असे सांगत मुलांना दरमहा १० हजार रुपये आईला देण्याचे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहेत.
उपनिषदांचा दाखला
न्यायालयाने पुराणातील ‘अक्षंती स्थविरे पुत्र’ या ओळींचा दाखला देत म्हटले की, आयुष्याची सायंकाळ गाठलेल्या आईची काळजी घेणे हे पुत्राचे कर्तव्य आहे. वृद्ध आईवडिलांकडे दुर्लक्ष करणे हे अतिशय घृणास्पद कृत्य असून त्याचे काेणतेही प्रायश्चित्त नाही.