इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सर्व जाती धर्माचे नागरिक असल्याने भारत हा सर्वधर्मसमभाव मानणारा देश असल्याचे राज्यघटनेत नमूद करण्यात आले आहे. सहाजिकच सर्व धर्मांना समान अधिकार आणि वागणूक मिळत असली तरी काही वेळा दोन धर्मांमध्ये विनाकारण तणाव निर्माण होतो त्यामुळे सामाजिक वातावरण गढूळ बनते, असाच प्रकार अलीकडच्या काळात शाळा-महाविद्यालयांमध्ये देखील दिसू लागला आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
कर्नाटकातील चिक्कमंगळुरू जिल्ह्यातील बालागडी प्रथम श्रेणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील वाद अखेर संस्थेतील बैठकीनंतर संपला. हिजाब घालून आलेल्या मुस्लिम वर्गमित्रांचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांचा एक गट भगवी शाल घालून कॉलेजमध्ये आला होता. त्यानंतर हा वाद आणखी वाढला. मात्र पालक आणि व्यवस्थापन यांच्यात झालेल्या बैठकीत मुस्लीम मुलींना हिजाब घालणार नाही आणि हिंदू विद्यार्थ्यांनाही त्यांच्या पोशाखासोबत भगवी शाल वापरण्याची परवानगी नसल्याचा निर्णय घेण्यात आला.
मुस्लीम मुलींनी हिजाब परिधान करून वर्गात जाण्याला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांचा एक गट भगवा स्कार्फ घालून महाविद्यालयात आल्याने शासकीय पदवी महाविद्यालयाचे व्यवस्थापन अडचणीत आले. तसेच वाद सुरू झाल्यावर कॉलेजने मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब न घालण्याचे आदेश दिले. मात्र, नंतर हा आदेश मागे घेण्यात आला. यानंतर शाल पांघरून विद्यार्थ्यांच्या गटाने विरोध सुरू केला. तीन वर्षांपूर्वी अशीच घटना घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यावेळी कोणीही हिजाब घालून कॉलेजमध्ये यायचे नाही, असे ठरवले होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून काही महिला तो परिधान करून कॉलेजमध्ये येत आहेत. मात्र, हा नियम मोडल्याने काहींनी भगवी शाल परिधान करण्याचा निर्णय घेतला.
प्राचार्य अनंता मूर्ती म्हणाले की, मुस्लिम विद्यार्थ्यांना वर्गात बुरखा घालण्याची परवानगी असेल. 2018 मध्येही असाच निर्णय विद्यार्थ्यांना बुरखा घालण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी बैठकीत पालकांना सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये शिस्तीचा भंग करू नये यासाठी कॉलेजचे अधिकारी कडक पावले उचलतील आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटीस पत्र दिले जाईल. काही आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी आहे की, जर त्यांना हिजाब घालण्याची परवानगी असेल तर त्यांना भगवा स्कार्फ आणि शाल घालून येण्याची परवानगी द्यावी.
महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी हिजाब परिधान केलेल्या सहा विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश नाकारल्यानंतर ही घटना घडली आहे. तीन दिवस विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश न दिल्याने शनिवारी या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन केले. ड्रेस कोडवर वर्गात न येण्याबरोबरच, विद्यार्थ्यांना उर्दू, अरबी आणि बेरी भाषेत बोलू दिले जात नसल्याचीही तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली.