इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते जगदीश शिवप्पा शेट्टर यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सहा वेळा आमदार राहिलेले शेट्टर यांना तिकीट न मिळाल्याने नाराज होते. शेट्टर यांना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाचे सदस्यत्व दिले. बीएस येडियुरप्पा यांच्यानंतर शेट्टर हे लिंगायत समाजाचे दुसरे सर्वात प्रभावशाली नेते मानले जातात. कर्नाटकात लिंगायत मतदारांची लोकसंख्या १७ टक्के आहे. लिंगायत मतदार कर्नाटकात अनेकांचा खेळ बिघडवू शकते, असे बोलले जाते. त्यामुळेच आता कर्नाटकच्या राजकारणात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
शेट्टर हे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. ते काँग्रेसमध्ये का आले? शेट्टर यांचे राजकीय वजन किती आहे? त्यांच्यामुळे राजकारणात काय बदल होणार? भाजपला किती तोटा होणार? असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. त्याविषयी जाणून घेऊया…
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जगदीश शेट्टर म्हणाले की, ‘मी काल भाजपचा राजीनामा दिला आणि आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपने मला प्रत्येक पद दिले आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी नेहमीच पक्षाच्या विकासासाठी काम केले. पक्षाचा ज्येष्ठ नेता असल्याने मला तिकीट मिळेल असे वाटले होते, पण तिकीट मिळत नसल्याचे कळताच मला धक्का बसला. याबाबत कोणीही माझ्याशी बोलले नाही किंवा मला समजावण्याचा प्रयत्नही केला नाही. मला कोणते पद दिले जाईल, याचेही आश्वासन देण्यात आले नाही.
जगदीश शेट्टर यांनी २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत धारवाड जिल्ह्यातील हुबळी धारवाड मध्य मतदारसंघातून विजय मिळवला. शेट्टर सलग सहा वेळा निवडणूक जिंकत आहेत. २०१२ ते २०१३ पर्यंत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ६८ वर्षीय शेट्टर २००८ ते २००९दरम्यान कर्नाटक विधानसभेचे अध्यक्षही होते. कित्तूर कर्नाटक (मुंबई कर्नाटक) विभागातील २५ विधानसभा जागांवर शेट्टर यांचा प्रभाव असल्याचे म्हटले जाते.
२० ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राज्यातील भाजप सरकारमध्ये उद्योग मंत्रीपद देण्यात आले. बीएस येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळ विसर्जित केले जात असताना, त्यांनी घोषणा केली की, भविष्यात कोणत्याही मंत्रिमंडळाचा भाग होणार नाही. अर्थात शेट्टर हे संतप्त झाल्याचे ते लक्षण होते. ते संघाचे जुने कार्यकर्ते आहेत. कित्तूर कर्नाटक परिसरात त्यांची पकड खूप मजबूत मानली जाते. येडियुरप्पा यांच्यानंतर शेट्टार हे राज्यातील दुसरे सर्वात प्रभावशाली लिंगायत नेते मानले जातात.
राज्यातील सत्तेची चावी लिंगायतांच्या हाती असल्याचे बोलले जाते. हुबळी-धारवाड मध्यवर्ती जागा त्यांची पारंपारिक जागा मानली जाते. डिसेंबर १९५५ मध्ये जन्मलेले शेट्टर १९९४ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आणि त्यानंतर १९९६ मध्ये त्यांना भाजपचे सचिव बनवण्यात आले. २००५ मध्ये त्यांना कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बनवण्यात आले.
शेट्टर यांनी ६ वेळा निवडणूक जिंकली आहे आणि प्रत्येक वेळी त्यांच्या विजयाचे अंतर २५ हजारापेक्षा पेक्षा जास्त आहे. अनेक सरकारांमध्ये त्यांनी विविध मंत्रालयेही सांभाळली आहेत. कर्नाटक भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते, ज्यांनी पक्षाला आपल्या पायावर उभे केले. येडियुरप्पा यांच्याही ते जवळचे होते.
कर्नाटकातील लिंगायत समाजाचा इतिहास बाराव्या शतकापासून सुरू होतो. १९५६ मध्ये भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. यासह म्हैसूर हे कन्नड भाषिक राज्य अस्तित्वात आले. ज्याला नंतर कर्नाटक म्हटले गेले. राज्याच्या स्थापनेपासून येथे लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे.
https://twitter.com/SupriyaShrinate/status/1647868160035676162?s=20
Karnataka Election Politics Jagdish Shettar Join Congress effect