इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पक्षाच्या नव्या धोरणांवर किंवा निर्णयांवर बरेचदा राष्ट्रीय पातळीवरील ज्येष्ठ नेते नाराज असतात. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत असतो. पण एखाद्या राज्यातील नेता नाराज झाला तर त्याची समजूत स्थानिक पातळीवरही काढली जाईल की नाही शंका असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र कर्नाटकातील एका नाराज नेत्याला फोन करून त्याची समजूत काढली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक फोन करून एखाद्याला धक्का दिल्याच्या बातम्या आपण ऐकतो. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील जे.पी. नड्डा यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या एका स्थानिक नेत्याला पंतप्रधानांनी फोन करून त्याची समजूत काढली होती. अगदी त्याचप्रमाणे त्यांनी आता कर्नाटकातील एका नेत्याला फोन करून त्याची समजूत काढली. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिवमोग्गा मतदारसंघाचे पाचवेळचे आमदार के.एस. ईश्वरप्पा यांना पंतप्रधान मोदींचा फोन आला होता.
ईश्वरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा करत मुलाला पुढे केले आहे. ते भाजपचे ज्येष्ठ नेते असून शिवमोग्गा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत त्याला तिकीट मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु, भाजपने काल उमेदवारांची चौथी आणि अंतिम यादी जाहीर केली आणि त्यात ईश्वरप्पा यांच्या मुलाचे नाव नव्हते. त्यामुळे ते नाराज झाले होते. अगदी दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन केला आणि सर्वांत आधी प्रकृतीची विचारपूस केली. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपबद्दल जनसामान्यांच्या काय भावना आहेत, हेही जाणून घेतले.
फक्त आशीर्वाद हवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला तेव्हा आजुबाजुला ईश्वरप्पा यांचे कुटुंबीय देखील उभे होते. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी एकत्र काम करण्याचा विश्वास ईश्वरप्पा यांनी पंतप्रधानांना दिला. तसेच, फक्त आपल्या आशीर्वादाची गरज आहे, असेही ते पंतप्रधानांना म्हणाले.
अनपेक्षित फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला फोन करतील, अशी अपेक्षाच नव्हती. हा फोन माझ्यासाठी अत्यंत अनपेक्षित आहे. त्यांच्या फोनमुळे शिवमोग्गा मतदारसंघात विजय प्राप्त करण्याची प्रेरणा मिळाली. कर्नाटकात पुन्हा एकदा भाजपचे सरकार आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया ईश्वरप्पा यांनी दिली.
https://twitter.com/vijaythottathil/status/1649298985675374594?s=20
Karnataka Election PM Modi Call to BJP Leader Eshwarappa