इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटक विधानसभेची रणधुमाळी सध्या सुरू आहे. देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक असलेल्या एन नागराजू यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज भरताना त्यांनी आपली एकूण संपत्ती १६०९ कोटी रुपये असल्याचे घोषित केले आहे. त्यांनी बेंगळुरूमधील होस्कोटे विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १० मे रोजी मतदान होणार आहे.
एन नागराजू यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, त्यांचा व्यवसाय शेतकरी आणि व्यापारी असा आहे. त्यांची पत्नी एम शांताकुमारी गृहिणी आहेत. एन नागराजू यांची एकूण जंगम मालमत्ता ५३६ कोटी रुपये आहे. त्याच वेळी, त्यांच्याकडे १०७३ कोटी रुपयांची स्थिर मालमत्ता आहे. २०२० ची विधान परिषद निवडणूक लढवताना, त्यांनी आपल्या पत्नीसह १२२० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नागराजू यांनी त्यांची एकूण देणी ९८.३६ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. ७२ वर्षीय नागराजू यांनी केवळ नववीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत शेती, घर, व्यवसाय आणि इतर आहेत.
नागराजू हे २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत होस्कोटे येथून विजयी झाले होते. ते १७ नेत्यांपैकी एक होते ज्यांचे काँग्रेस-जेडीएस युतीचे सरकार केवळ एका वर्षात पक्ष बदलल्यामुळे पडले. नंतर पोटनिवडणुकीत ते अपक्ष उमेदवार शरथ बाचेगौडा यांच्याविरुद्ध पराभूत झाले. बाचेगौडा आता काँग्रेससोबत आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नागराजू यांचा सामना बाचेगौडा यांच्याशी होणार आहे.
Karnataka Election BJP N Nagaraju Asset Declared