इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जी ऐकून तुमचे मनही हादरेल. पत्नीचे त्याच्या मित्रासोबत अवैध संबंध असल्याचा संशय पतीला आला. अखेर संतप्त पतीने मित्राचा गळा कापला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर गळा चिरून त्याचे रक्तही प्यायले.
कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथून ही भीषण घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना एका साक्षीदाराने कॅमेऱ्यात कैद केली आहे. आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी सांगितले की, विजय आणि मारेश हे चांगले मित्र आहेत. मात्र, मारेशचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय विजयला होता. त्यामुळे विजयने मारेशला भेटायला बोलावले. भेटीदरम्यान किरकोळ वादावादी झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर रागाच्या भरात विजयने धारदार शस्त्राने मारेशचा गळा चिरला.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये विजयने मारेशचा गळा कापल्याचे दिसून येते. नंतर त्याला खूप मारहाण झाली. एवढे करूनही त्याचे समाधान झाले नाही तेव्हा आरोपीने त्याच्या मित्राला पकडून त्याचे रक्त पिण्यास सुरुवात केली.
अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी विजयला अटक केली. विजयविरुद्ध केंचरलाहल्ली पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर मारेशवर उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.