इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटक विधानसभेत काँग्रेस आमदारांनी गुरुवारी रात्रीपर्यंत निदर्शने केली. एवढेच नाही तर घरुन गाद्या आणून या आमदारांनी सभागृहातच मुक्काम केला. त्यामुळे ही बाब संपूर्ण देशभरात चर्चेची ठरत आहे. राज्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या भगवा ध्वजासंदर्भातील विधानावरून काँग्रेस आमदारांनी राजीनाम्याची मागणी केली. ग्रामीण विकास आणि पंचायत राज्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना पदच्युत करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत काँग्रेस आमदारांनी विधानसभेत संपूर्ण रात्रभर विरोध नोंदवला. आमदारांनी गाद्या आणून तिथेच मुक्काम ठोकला. काँग्रेसच्या या निदर्शनाचा आजचा दुसरा दिवस आहे. काँग्रेसचे सदस्य विधानसभेतच थांबून राहिले. त्यांचा गोंधळ आणि निदर्शने सुरू होती. यादरम्यान विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी विधानसभा परिसरात विरोधीपक्ष नेते सिद्धरामैय्या यांची भेट घेतली.
ईश्वरप्पा यांनी दावा केला होता, की भविष्यात भगवा ध्वज राष्ट्रीय ध्वज होऊ शकतो. विरोधीपक्षाच्या आमदारांच्या गोंधळामुळे गुरुवारी दिवसभर विधानसभेचे कामकाज स्थगित झाले. काँग्रेस आमदारांनी सभागृहातच तळ ठोकला. आमदारांच्या गोंधळामुळे दुसऱ्या दिवशीही सभागृहाचे कामकाज ठप्प झाले होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी विरोधीपक्ष नेते सिद्धरामैय्या यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु कोणतेही यश मिळाले नाही. येडियुरप्पा म्हणाले, आम्ही दोन तास विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगितले, की विधानसभेत झोपू नये, परंतु त्यांनी आधीच निर्णय घेतला होता. विधानसभा अध्यक्षांनीसुद्धा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकायला तयार नव्हते. आम्ही उद्याही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू.
https://twitter.com/ANI/status/1494379995770535936?s=20&t=J1bTiWWipE9geegodMIFTg