इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखादा मोठा खर्च करण्याची डिमांड आली की ‘पैसे काय झाडाला लागतात का?’ असे आपण गमतीने म्हणतो. प्रत्यक्षात पैशांचे झाड कधीच नसते. पण कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याच्या भावाच्या घरी झाडावर एक कोटी रुपये ठेवलेले आढळले आहेत. त्यामुळे आता कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतील प्रचाराला वेगळेच वळण मिळाले आहे.
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. यात काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष प्रामुख्याने आमनेसामने आहेत. गेल्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने आर्थिक बळ वापरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर काँग्रेसने मला फक्त शिव्या देण्यातच वेळ घालवला आहे, अशी टीका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील सभेत केली. याशिवाय दोन्ही बाजुंनी भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने होताना दिसत आहेत. यातच आयकर विभागाने एका छाप्यात काँग्रेस नेत्याच्या भावाच्या घरून झाडावर लटकलेले १ कोटी रुपये ताब्यात घेतले आहेत.
कर्नाटक काँग्रेसचे नेते अशोक कुमार राय यांचे बंधू सुब्रमण्यम राय यांच्या म्हैसूर येथील घरावर आयकर विभागाने आज छापा टाकला. त्यावेळी एका बॉक्समध्ये भरलेले एक कोटी रुपये झाडावर ठेवलेले आयकरच्या अधिकाऱ्यांना आढळले. विशेष म्हणजे अशोक कुमार राय हे विधानसभा निवडणुकीत पुत्तुर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपला आता प्रचारासाठी मोठा मुद्दा हाती लागला आहे.
११० कोटी जप्त
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने राज्यभर छापे टाकायला सुरुवात केली आहेत. यामध्ये २ हजार ३४६ एफआयआर आतापर्यंत नोंदविण्यात आले आहेत. तर राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून ११० कोटी रुपयांपेक्षा अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे.
https://twitter.com/rsoniofficial9/status/1653731935410327553?s=20
Karnataka Congress Leader Home Tree Money