इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुहूर्त, वेळ-काळ, ग्रहदशा यावर सर्वसामान्य लोकांचा फार विश्वास असतो. मात्र त्याहीपेक्षा जास्त राजकीय पुढारी या सर्व गोष्टींच्या मागे लागत असतात. अर्थात काही अपवाद ठरतात. त्यात आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे नाव आवर्जून घेतले जाईल.
काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारचा ‘भुलभुलैय्या’ नावाचा एक सिनेमा आला होता. यात मंजोलिकाचे भूत एका खोलीत बंद असलेले दाखविले आहे. त्या खोलीचा दरवाजा कित्येक वर्षांपासून कुणी उघडलेला नसतो. अर्थात त्या घराची तशी प्रथाच झालेली असते. असाच एक दरवाजा कर्नाटक येथील मुख्यमंत्री कार्यालयात आहे. हा दरवाजा सुद्धा बंदच असतो आणि कुणीच त्याला उघडण्याची हिंमत करत नाही. सिद्धरामय्या यांनी हे दार उघडून सर्वांचे लक्ष वेधले आहे. हे दार बंद असण्यामागचे कारण मात्र वेगळे आहे. हे दार दक्षिणमुखी असल्यामुळे त्याबद्दलचे समज-गैरसमज आहेत.
१९९९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जे.एच. पटेल यांनी हे दार बंद केले होते. दक्षिणमुखी दारातून दैनंदिन व्यवहार केल्यामुळे निवडणुकीत अपयश आले, असे समजून त्यांनी १९९९ मध्ये हे दार बंद केले. त्यानंतर २०१३ मध्ये सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी हे दार उघडले. त्यानंतर २०१८ मध्ये सत्तांतर झाले आणि दार पुन्हा बंद झाले. या दाराची ही कहाणी येथील सर्वसामान्य जनतेसाठी कायमच मनोरंजक ठरली आहे. कारण २०१८ मध्ये मुख्यमंत्र्यांनी आपली राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ नये म्हणून हे दार बंद केले. नेमकी सत्ता गेली आणि कारकिर्दही जवळपास संपुष्टात आली. आता २०२३ मध्ये पुन्हा सिद्धरामय्या यांनी सत्तेची सूत्रे हातात घेतली आणि बंद दरवाजा उघडला. त्याच दाराने प्रवेश तर्कसंगत बाबी मी मानत नाही, असे सिद्धरामय्या यांनी ट्वीट करून स्पष्टपणे सांगितले आहे. वास्तूदोषाच्या कारणाने बंद असलेल्या दारातूनच मी प्रवेश केला. कारण इथनं भरपूर सूर्यप्रकाश आत येतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
मानसिकता शुद्ध आहे?
मानसिकता शुद्ध असेल तर अशुभ होण्याचे कारण नाही, असे सांगणारे सिद्धरामय्या यांनी काहीवर्षांपूर्वी कारवर कावळा बसल्यामुळे कार विकली होती, याचीही आठवण या निमित्ताने झाली. विशेष म्हणजे तेव्हा ते मुख्यमंत्री होते.