इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पेटलेला असतानाच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा सीमावादावरुन वक्तव्य केलं आहे. सीमाप्रश्नावर आमचं सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. तसेच महाराष्ट्राच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानेही काही फरक पडणार नाही, असं ट्विट बोम्मई यांनी केलं आहे. त्यामुळे बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत खासदारांनी महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद, कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्ये याची माहिती दिली. या मुद्द्यांवर त्या अतिशय संवेदनशीलपणे आणि राजकारण बाजूला ठेवून मार्ग काढावा, अशी विनंती अमित शाह यांना केल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. तसंच महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाबाबत गृहमंत्री अमित शाह नक्कीच मार्ग काढतील, असा विश्वास देखील व्यक्त केला. तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाविषयी कर्नाटकची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी लवकरच अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं बोम्मई यांनी सांगितलं आहे.
याबाबत पुढे ते म्हणाले, महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत मी कर्नाटकच्या खासदारांना सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी कळवलं आहे. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार आहे, असं बसवराज बोम्मई यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
पुन्हा उफळला सीमावाद..
सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं होतं. यावरुन सीमावादाचा प्रश्नाला पुन्हा वाचा फुटली. त्यावर उत्तर देताना कर्नाटकच्या महाराष्ट्रातील एकही गाव कुठेही जाणार नाही, पण सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह गाव मिळवण्याचा प्रयत्न करु असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं होतं. यानंतर बसवराज बोम्मई यांनी सोलापुरातील काही जिल्ह्यांमधील गावांवर दावा केला आणि सीमाप्रश्न आणखीच पेटला. त्यानंतर दोन्ही राज्यांच्या बससेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या. त्यातच बेळगावमधील हिरेबागवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा ट्रकची तोडफोड करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांना गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली.
Karnataka CM Bommai on Marathi MP Amit Shah Meet