नवी दिल्ली – कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या अतिउत्साही बातम्या सध्या व्हायरल होत आहेत. ते राजीनामा देणार आहेत, हे जवळपास निश्चित झालेले असले तरीही अद्याप त्यांनी पद सोडलेले नाही, हेच सत्य आहे. अर्थात या राजीनाम्यामागे त्यांची कुठलीही राजकीय खेळी नसून पक्षानेच त्यांना वयाचा विचार करता घरी बसण्याचा सल्ला दिला आहे.
येडियुरप्पा गेल्या काही दिवासांपासून सातत्याने दिल्लीच्या फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या बातम्याही पुढे येत होत्या. ७८ वर्षाच्या येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे. मात्र त्यासाठी येडियुरप्पांना तयार करणे हे मोठे आव्हान होते. शनिवारच्या दिल्ली फेरीत ते तयार झाले असून त्या मोबदल्यात मुलगा विजयेंद्र याला सत्तेत योग्य पदावर घेण्याचे आश्वासन येडियुरप्पांना देण्यात आले आहे.
२६ जुलैला त्यांच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण होतात. त्यामुळे राजीनाम्याची तिथी निवडण्याचे स्वातंत्र्य पक्षाने त्यांनाच दिले आहे. त्याच दिवशी पर्यायी नेतृत्वाची घोषणासुद्धा होईल. शुक्रवारी येडियुरप्पा पंतप्रधान मोदींना भेटले आणि शनिवारी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही भेटले. बराच वेळ येडिंनी तयारी दाखवली नाही. पुढच्या महिन्यात पंतप्रधानांकडून स्पष्ट आश्वासन मिळाल्यानंतरच निर्णय घेईल, असा आग्रह त्यांनी केला. पण अखेर पक्षश्रेष्ठींनी त्यांचे मन वळवलेच.
बळजबरी धोकादायक
येडियरप्पांना बळजबरीने पदावरून हटविणे भाजपला धोकादायक वाटत आहे. २०२३ मध्ये निवडणुका आहेत आणि येडियुरप्पा लिंगायत समाजाचे सर्वांत मोठे नेते आहेत. गेल्यावेळी त्यांनी बंड केले तर भाजपचा जनाधार कमी झाला होता.