इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकमध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करण्यावरून सुरू झालेला वाद शमत नाही, तोच आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटकमधील उडुपी येथील मंदिरांमधील कार्यक्रमांमध्ये बिगर हिंदू व्यावसायिक आणि दुकानदारांना प्रवेशबंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता ही मागणी राज्यातील इतर भागातील मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि वार्षिक जत्रांमध्येसुद्धा केली जाऊ लागली आहे.
उडुपी जिल्ह्यातील कौप मारी गुडी उत्सवापासून ही मागणी केली जात आहे. हिंदू नसलेल्या दुकानदार आणि व्यावसायिकांना परवानगी देऊ नये, अशा आशयाचे फलक उत्सवाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. अशाच प्रकारचे फलक आता पद्विदरी मंदिर उत्सवात आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यातील काही मंदिरातही लावण्यात आले आहेत.
मारी गुडी मंदिर व्यवस्थापनाने हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीवर विचार केला होता. काही हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध भागात अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात कर्नाटक हिंदू धार्मिक संस्थान नियमावली २००२ आणि धर्मादाय व्यवस्था अधिनियम-१९९७ च्या नियमांचा हवाला दिला आहे.
विश्व हिंदू परिषद (विहिंप) च्या म्हैसूर येथील कार्यकर्त्यांनी शनिवारी धर्मादाय विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मंदिरांमध्ये होणाऱ्या वार्षिक उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये बिगर हिंदू व्यावसायिक आणि दुकानदारांना प्रवेश रोखण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. म्हैसूर येथील प्रसिद्ध चामुंडेश्वरी मंदिराजवळ मुस्लिम व्यावसायिकांना वाटप करण्यात आलेल्या दुकानांवरही लक्ष घालण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हिंदू कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम संघटनांनी बंद पुकारण्याच्या कृतीला हे प्रत्युत्तर आहे. विरोध करण्याची ही कृती देशातील कायदा आणि भारताच्या न्याय प्रणालीबाबत अनादर करण्यासारखीच आहे. हिंदू मंदिरांमध्ये बिगर हिंदू व्यावसायिकांना रोखण्यासाठी मांड्या, शिमोगा, चिक्कमगळुरू, तुमकुरू, हासन आणि इतर स्थानांवर फलके लावण्यात आले आहेत.