दिल्ली – कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ बसवराज बोम्मई यांनी आज राजभवनातील ग्लास हाऊस येथे घेतली. राज्यपाल धावरचंद गहलोत यांनी ही शपथ दिली. या शपथग्रहण सोहळ्यात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, केंद्रातील मंत्री व राज्यातील नेते उपस्थितीत होते. शपथग्रहण सोहळ्यापूर्वी बोम्मई मारुती मंदिरात दर्शनासाठी गेले होते. आता शपथग्रहणानंतर ते कॅबिनेटची बैठक घेणार असून राज्यातील कोविड व पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात बोम्मई यांची निवड करण्यात आली. त्यानंतर बोम्मई यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बोम्मई हे येडियुरप्पा सरकारमध्ये गृहमंत्री होते. ते माजी मुख्यमंत्री एसआर बोम्मई यांचे पुत्र आहेत. येडियुरप्पा यांच्या जवळचे आणि लिंगायत समाजाचे असल्यामुळे त्यांची वर्णी लागली. ६१ वर्षीय बोम्मई हे कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री ठरले आहे.
बोम्मई यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या बी एस बोम्मई यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या बी एस बोम्मई यांचे अभिनंदन. विधिमंडळ आणि प्रशासकीय समृद्ध अनुभव लाभलेले बोम्मई ,राज्यात आमच्या सरकारने केलेले असामान्य कार्य वृद्धिंगत करतील असा मला विश्वास आहे. यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1420265378500935684?s=20