नवी दिल्ली – कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी बसवराज बोम्मई यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या जागेवर भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात बोम्मई यांची निवड करण्यात आली. उद्या बोम्मई हे मुख्यमंत्रीपदाची दुपारी ३ वाजता शपथ घेणार आहे. बोम्मई हे येडियुरप्पा सरकारमध्ये गृहमंत्री होते.
कर्नाटक सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असतांना येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर पुढील मुख्यमंत्री कोण असेल याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले होते. कोणाची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागले याबाबत औत्सुक्य होते. पण, आता नावाची घोषणा झाल्यानंतर हे औत्सुक्य सुध्दा संपले आहे. बसवराज बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अंत्यत जवळचे मानले जात आहे. बोम्मई यांच्या निवडीनंतर जेष्ठ आमदार व मंत्री नाराज झाल्याचे बोलले जात आहे. २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये निवडणुका आहेत. त्यात ही नाराजी कायम राहिली तर भाजपची पुढील वाट अवघड होणार आहे.
या कारणासाठी येडियुरप्पा यांनी दिला राजीनामा
येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागे कुठलीही राजकीय खेळी नव्हती. पक्षानेच त्यांना वयाचा विचार करता घरी बसण्याचा सल्ला दिला होता. येडियुरप्पा गेल्या काही दिवासांपासून सातत्याने दिल्लीच्या फेऱ्या मारत होते. त्यामुळे विविध प्रकारच्या बातम्याही पुढे येत होत्या. ७८ वर्षाच्या येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा होती. मात्र त्यासाठी येडियुरप्पांना तयार करणे हे मोठे आव्हान होते.पण, या राजीनाम्याच्या मोबदल्यात मुलगा विजयेंद्र याला सत्तेत योग्य पदावर घेण्याचे आश्वासन येडियुरप्पांना देण्यात आल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.