नवी दिल्ली – कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. आजच कर्नाटक सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहे. त्यात त्यांनी ही घोषणा केली आहे. आता या राजीनाम्यानंतर पुढील मुख्यमंत्री कोण असेल याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे. येडियुरप्पा राजीनामा देणार आहेत, हे जवळपास निश्चित होते. पण, त्यांनी पद सोडले नव्हते. अर्थात या राजीनाम्यामागे त्यांची कुठलीही राजकीय खेळी नसून पक्षानेच त्यांना वयाचा विचार करता घरी बसण्याचा सल्ला दिल्याचे बोलले जात आहे. येडियुरप्पा गेल्या काही दिवासांपासून सातत्याने दिल्लीच्या फेऱ्या मारत होते. त्यामुळे विविध प्रकारच्या बातम्याही पुढे येत होत्या. ७८ वर्षाच्या येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा होती. मात्र त्यासाठी येडियुरप्पांना तयार करणे हे मोठे आव्हान होते.पण, या राजीनाम्याच्या मोबदल्यात मुलगा विजयेंद्र याला सत्तेत योग्य पदावर घेण्याचे आश्वासन येडियुरप्पांना देण्यात आल्यामुळे त्यांनी अखेर राजीनामा देण्याची घोषणा केली.
आज त्यांच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाले आहे. त्यामुळे राजीनाम्याची तिथी त्यांनी आज निवडली. आजच पर्यायी नेतृत्वाची घोषणासुद्धा होणार आहे. याआगोदरच येडियुरप्पा पंतप्रधान मोदींना भेटले, त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याही त्यांनी भेटी घेतल्या आहे.
मनधरणी करुन राजीनामा
येडियरप्पांना बळजबरीने पदावरून हटविणे भाजपला धोकादायक वाटत असल्यामुळे त्यांची मनधरणी करुन त्यांना वेळ देण्यात आला. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये निवडणुका आहेत आणि येडियुरप्पा लिंगायत समाजाचे सर्वांत मोठे नेते आहेत. गेल्यावेळी त्यांनी बंड केले तर भाजपचा जनाधार कमी झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही बळजबरी करण्यात आली नाही. पण, त्यांची मनधरणी करुन त्यांना अखेर राजीनामा देण्यास भाजपने भाग पाडले.