कर्नाल (हरियाणा) – येथे शेतक-यांवर झालेल्या लाठीमारामुळे हरियाणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणाची गंभीरता पाहून भाजप प्रदेशाध्यक्ष ओ. पी. धनखड यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याशी चर्चा केली. काँग्रेससह विरोधीपक्षांकडून हा मुद्दा तापविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
कायदा आणि सुव्यवस्था एडीजीपी नवदीप विर्क यांनी शेक-यांवर खापर फोडले आहे. शेतक-यांच्या हल्ल्यात दहा पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतक-यांच्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी पोलिसांना शक्तीचा प्रयोग करावा लागला. काँग्रेससह विरोधीपक्षांनी लाठीमार झाल्याच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यादरम्यान, शेतक-यांवर झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर कर्नालचे एसडीएम आयुष सिन्हा यांनी बळाचा वापर करण्याचे आदेश देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते सांगताना दिसत आहे, की “या नाक्यावरून कोणत्याही परिस्थितीत शेतक-यांना पुढे जाऊ दिले जाऊ नका. पुढे गेल्यास त्यांच्यावर लाठीमार करावा.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ लाठीमार झालेले घटनास्थळ असेलल्या बसताडा टोल प्लाझावरील नसून, कलंदरी गेट डेरा कारसेवाजवळील नाक्यावरील असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा विरोध करणा-या शेतक-यांवर शनिवारी पोलिसांनी लाठीमार केला. यादरम्यान जवळपास १० शेतकरी जखमी झाले आहेत. त्यानंतर कर्नालचे एसडीएम आयुष सिन्हा यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर येताच राजकीय वातावरण गरम झाले आहे. यावरून मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कार्यशैलीवर टीका होत आहे.