बीड – अभिनेत्री करीना कपूरने लिहलेल्या पुस्तकाचे नाव सध्या वादात सापडले आहे. बाळंतपणावर करीना कपूर आणि तिची सहकारी लेखिका आदिती शहा यांनी ‘करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाच्या नावातील बायबल शब्दाच्या वापरावर ओमेगा ख्रिश्चन महासंघाने आक्षेप घेतला आहे. या नावामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याचा गंभीर आरोप महासंघाने केला आहे. महासंघाने करीना विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
ख्रिश्चन धर्मियांचा बायबल हा पवित्र धर्मग्रंथ आहे. त्यामुळे या पुस्तकातील बायबल शब्द तत्काळ हटवावा अशी मागणी महासंघाने केली आहे. तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी करीना कपूर आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. करीना कपूर, आदिती शहा तसेच प्रकाशकांनी तत्काळ ख्रिश्चन समाजाची माफी मागावी, अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने केली आहे. दरम्यान हे पुस्तक अॅमेझॉनवर बेस्ट सेलर म्हणून ट्रेंडिंगवर असल्याचे बोलले जात आहे.