इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कर्नाटकात एका आंदोलनाच्या निमित्तानं गणपतीला अटक झाल्याची चर्चा असतांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेबाबत फेक नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकातील एका घटनेबद्दल खोटी माहिती पसरवून सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पटोले यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजप आणि महायुती फेक नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अगोदर राहुल गांधी यांच्याबद्दल स्वतःच फेक न्यूज पसरवून आंदोलन करत होते. आता कर्नाटकातील एका घटनेबद्दल खोटी माहिती देऊन फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राज्यातील सुज्ञ जनता यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. जनतेला यांचा खरा चेहरा माहित आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले होते
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियात तीन फोटो टाकत म्हटले होते की, हे दृश्य महाराष्ट्रातील जनता कधीच विसरणार नाही आणि माफ करणार नाही!
आम्ही कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचा तीव्र निषेध करतो!!!
नेमकं घडलं काय
दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातल्या मांड्या शहरात विसर्जनावेळी दोन गटात वाद झाला होता. त्या घटनेचा निषेध म्हणून बंगळुरात विश्व हिंदू परिषदेने आंदोलन पुकारण्याची घोषणा केली. परवानगी नसताना बंगळूरच्या टाऊन हॉल परिसरात लोक जमू लागल्यानं पोलीस बंदोबस्त वाढवला गेला. त्यानंतर काही कार्यकर्ते आंदोलनातच गणपतीची मूर्ती डोक्यावर धरुन घोषणा देत आंदोलनस्थळी पोहोचले पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंदोलकांनी मूर्तीला घेवून रस्त्यावरच ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आधी मूर्तीला आंदोलकांकडून घेत पोलीस व्हॅनमध्ये ठेवलं. नंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. थोड्यावेळानं तिथं दुसरी पोलीस कार आल्यानंतर व्हॅनमधली मूर्ती कारमध्ये ठेवण्यात आली. मात्र तोपर्यंत पोलीस व्हॅनमध्ये ठेवलेल्या गणेशमूर्तीचे फोटो पत्रकारांनी टिपले आणि ते फोटो व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस शासित राज्यात गणपतीलाही अटक झाल्याची टीका भाजपनं केली.