नवी दिल्ली – काँग्रेस पक्षामधील अंतर्गत कलह आणि संकटांची मालिका काही केल्या कमी होताना दिसत नाही. पंजाबमध्ये सत्ता असूनही तेथे ज्या पद्धतीने नाट्यमय घडामोडी घडत आहेत त्याबाबत देशभरातच चर्चा झडत आहे. अशा स्थितीतच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीच काँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल भेट घेतली आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. पंजाब काँग्रेसमध्ये सिंग यांना राजीनामा द्यायला सांगणे, प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडे देणे आणि चरणजित सिंग चेन्नी यांना मुख्यमंत्री करणे हे सारे निर्णय कोण घेत आहे हे समजत नाही. पक्षाला अध्यक्ष नसताना असे निर्णय घेण्यातून पक्षाची मोठी हानी होत असल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे. पक्षाने तत्काळ वर्कींग कमिटीची बैठक बोलवावी, अशी मागणी सिब्बल यांनी केली आहे. अशीच मागणी गुलाम नबी आझाद यांनीही केली आहे. त्यामुळे आता पुढे काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
In our party, there is no president so we don't know who is taking these decisions. We know & yet we don't know: Congress leader Kapil Sibal in Delhi pic.twitter.com/b5nrdktyZT
— ANI (@ANI) September 29, 2021