नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालमत्तेच्या हव्यासापोटी कापडणीस बापलेकाची हत्या करणाऱ्या संशयित आरोपी राहुल जगताप याच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळेच या हत्याकांडातील अनेक धागेदोरे समोर येत आहेत.
पंडित कॉलनीत राहणाऱ्या नानासाहेब रावजी कापडणीस व अमित नानासाहेब कापडणीस या बापलेकाची निर्दयीपणे हत्या राहुलने केली. ठराविक दिवसांच्या अंतराने हे हत्याकांड केल्याचे राहुलने कबूल केले आहे. न्यायालयाने राहूलला
दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, राहुलने खरेदी केलेली आलिशान रेंज रोव्हर ही कार मुंबईतील बॉलिवूड अभिनेत्याची असल्याचेही तपासात समोर आले आहे. हा बॉलिवूड अभिनेता नक्की कोण याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. पोलिस याप्रकरणी आणखी बाबी तपासून पाहत आहेत. कापडणीस बापलेकाची हत्या केल्यानंतर त्यांच्याकडील मालमत्तेतून मिळालेल्या पैशांच्या आधारे राहुलने ही आलिशान कार खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी उषाकिरण सोसायटीत तपासणी मोहिम राबविली. त्यात गुन्ह्यामध्ये वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने येथे परीक्षण केले आहे. काही पुरावे हस्तगत करुन ते परीक्षणासाठी पाठवण्यात आली आहेत. राहुलने उषाकिरण सोसायटीत भाड्याने फ्लॅट घेतला होता. तेथे ऑफिस थाटले होते. लपवलेले कार्ड आणि अन्य कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांच्या तपासात प्राथमिकदृष्ठ्या या हत्याकांडात कुणी साथीदार नसल्याचे निदर्शनास येत आहे. राहुल जगतापच्या लॅपटॉपचीही तपासणी सध्या सुरु आहे. राहुलने हॉटेल मॅनेजमेंट आणि एमबीए फायनान्स असे उच्च शिक्षण घेतलेले आहे. तो गोपाल पार्कमध्ये गेल्या ४ वर्षांपासून राहत होता. सरकारवाडा पोलिस या प्रकरणी सर्व शक्यता आणि धागेदोरे पडताळून पाहत आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात अनेक बाबींचा मोठा खुलासा होण्याची चिन्हे आहेत.