मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौत हिने भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल पुन्हा गरळ ओकली आहे. परिणामी तिच्यावर चौफेर टिकेची झोड उठली असून, भारत सरकारने दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे. या सर्व गदारोळात कंगना ने सोशल मीडियावर प्रत्युत्तर देत आपली बाजू स्पष्ट केली आहे.
स्वातंत्र्य भीक मागून मिळाल्याचे वक्तव्य केल्यावरून ट्रोल होत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौत हिने आपली बाजू मांडली आहे. १९४७ साली काय झाले होते हे कोणी सांगितले तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन, असे कंगना ने म्हटले आहे. ट्रोल करणार्या युजर्सना तिने इन्स्टाग्रामवर प्रत्युत्तर दिले आहे. १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य भिक होते. २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले होते, असे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केले होते. यावरून देशात एकच गदारोळ झाला होता.
कंगना आपल्या पोस्टमध्ये लिहिते, मुलाखतीत मी सर्व काही स्पष्ट केले होते. १८५७ मध्ये स्वातंत्र्यासाठी पहिल्या सामुहिक युद्धात सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकर यांच्यासारख्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने सुरू झाली होती.१८५७ च्या युद्धाबद्दल मला ठाऊक आहे, परंतु १९४७ मध्ये कोणते युद्ध झाले होते, मला ठाऊक नाही. कोणी हे सांगणार असेल तर मी माझा पद्मश्री सन्मान परत देईन आणि माफीसुद्धा मागेल. कृपया यामध्ये मला मदत करा.
कंगना पुढे लिहिते, मी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित एका चित्रपटात काम केले आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाबद्दल मोठे संशोधन केले आहे. राष्ट्रवादासह दक्षिणपंथाने उभारी घेतली, पण मग हे अचानक कसे समाप्त झाले? गांधीजी यांनी भगतसिंग यांना का बलिदान करू दिले? नेताजी बोस यांची हत्या कशी झाली? नेताजींना गांधीजींचा पाठिंबा का मिळाला नाही?
कंगना लिहिते, फाळणीची रेष इंग्रजांद्वारे का ओढण्यात आली? स्वातंत्र्यांचा आनंद साजरा करण्याऐवजी भारतीय नागरिक एकमेकांना मारत होते. मला अशा प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. त्यासाठी मला मदतीची आवश्यकता आहे. २०१४ मधील स्वातंत्र्याबद्दल बोलायचे झाल्यास मी विशेषरित्या सांगितले होते, की आपल्याला भौतिक स्वातंत्र्य मिळाले असेल, प्रथमच इंग्रजी न बोलणार्या किंवा लहान शहरातून आलेल्या किंवा भारतातील उत्पादनांचा वापर करण्यासाठी नागरिक आम्हाला लाज वाटू देणार नाहीत. जे चोर आहेत त्यांची जळणारच. कोणीही विजवू शकत नाही…जय हिंद.
कंगना च्या वादग्रस्त वक्तव्यावरून तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. सोशल मीडियावर #KanganaRanautDeshdrohi हे टॉप ट्रेडिंग कायम राहिलेले आहे. तिच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.