नाशिक – नांदगावचे आमदार सुहास कांदे यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात पोलिस आयुक्त दीपक पांडे चौकशी करणार आहेत. या प्रकरणी कांदे व आकाश निकाळजे या दोघांना पोलिस प्रशासनाने समन्स बजावले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही प्रक्रिया पार पडणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी धमकावण्यात आल्याच्या आरोपावर आमदार सुहास कांदे यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची प्राथिमक चौकशी नुकतीच पूर्ण झाली. मात्र, दोन्ही पक्षांकडून महत्त्वाचे ठरलेले कॉल रेकॉर्डिंग सादर झालेच नाही. हा चौकशी अहवाल समोर आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी स्वत: पुढील चौकशीची धुरा आपल्याकडे घेतली. छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने फोनवरून धमकावल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार कांदे यांनी पोलिस आयुक्तांकडे केली होती. या लेखी तक्रारीची चौकशी करण्याची जबाबदारी गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पीआय शेख यांनी कांदे आणि निकाळजे यांच्यासह अन्य तिघांचे जबाब नोंदवले. मात्र, यात महत्त्वाचे पुरावे समोर आलेच नाही. त्यात एकमेंकावर आरोप करण्यात आले. या पार्श्वभूमीवर चौकशी अहवाल समोर आल्यानंतर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दोघांकडे पुन्हा चौकशी करण्याचे नियोजन आखले. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच दोघांचे जबाब नोंदवण्यात येणार आहे. या तक्रारीच्या केंद्रस्थानी पालकमंत्री छगन भुजबळ असून, पोलिस आयुक्तांच्या संभाव्य चौकशी प्रक्रियेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.