नाशिक – गेले काही दिवसांपासून सातत्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचा कांदा ३० रुपये प्रति किलो या दराने सरसकट खरेदी करून हा कांदा परराज्यात व परदेशात पाठवावा व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे निवेदन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटने निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, कांदा भावाची घसरण झाल्यानं महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या कांद्याला जो दर मिळत आहे. त्यामध्ये उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. साठवणूक केलेल्या कांद्यामध्ये सड होण्याचे व वजन घटण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यातच आता कांद्याचे दर १२-१५ रूपये प्रति किलो इतके खाली आल्याने राज्यभरातील कांदा उत्पादकांमध्ये मोठी संतापाची भावना असल्याचे म्हटले आहे. हे निवेदन देतांना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, भाऊसाहेब केदार, अनिल दिघोळे, नितीन गिते, विजय दिघोळे उपस्थितीत होते.
आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या स्वीय साहाय्यक यांच्याकडे कांदा संघटनेने जिल्हाधिकारी यांना ५ मिनिटे भेटण्यासाठी विचारणा केली. सव्वा तीनच्या सुमारास जिल्हाधिकारी सुरज मांढरे हे कार्यालयात आले. तेव्हा स्वीय सहाय्यक यांनी कांदा संघटनेच्या शिष्टमंडळास भेट घ्यायची आहे, असा निरोप दिला, परंतु जिल्हाधिकारी यांनी ४ वाजता मिटींग आहे असे कारण सांगून कांदा संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना भेटावे असे सांगण्यात आले. यामुळे जिल्हाधिकारी या प्रश्नाबाबत उदासिन असल्याचे दिघोळे यांनी सांगितले. पण, हे निवेदन शासनापर्यंत पोहाचावे यासाठी निवासी उपजिल्हाधिकारांना निवेदन देण्यता आल्याची माहिती भारत दिघोळे यांनी दिली.