नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकऱ्यांचे थकीत असलेले पैसे जोपर्यंत दिले जात नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे थांबवावी, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांकडून बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया रोखली जाईल असे निवेदन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, ज्ञानेश्वर सानप, जनार्दन सोनवणे, शरद सोनवणे, तानाजी मापारी यांनी दिले.
जिल्ह्यातील बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री करून दोन दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी सिन्नर, उमराणा, येवल्यासह काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे कोट्यावधी रुपये बाजार समितीत शेतमाल खरेदीचे अधिकृत परवाने असलेल्या व्यापाऱ्यांकडे बाकी आहेत. शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांमध्ये वेळोवेळी संबंधित बाजार समित्यांमध्ये सतत चकरा मारुनही अजूनही शेतकऱ्यांना त्यांच्या कांदा विक्रीचे पैसे मिळालेले नाहीत.
शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री केल्यानंतर २४ तासाच्या आत शेतकऱ्यांची संपूर्ण रक्कम अदा करण्याचा शासन नियम असतांनाही गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे पैसे बाजार समितीमध्ये अडकलेले आहेत. या सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे नेमकी किती रक्कम थकीत आहे याची तत्काळ दोन दिवसात माहिती मागून घ्यावी आणि संबंधित बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांची संपूर्ण थकित रक्कम अदा करावी आणि त्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राबवाव्या असेही निवेदनात म्हटले आहे.