नाशिक – नाफेडसोबत कोणत्याही प्रकारचा संबंध नसणारे काही दलाल व खासगी कांदा खरेदीदार कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कमी दरात कांदा खरेदी करून त्यांची फसवणूक करण्याच्या काही तक्रारी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांनी सावध रहा पुरेशी माहिती घेऊनच कांदा विक्री करा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले आहे.
दिघोळे पुढे म्हणाले की, आम्हीही नाफेडची कांदा खरेदी करत आहोत असे खोटे सांगून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये काही दलाल कांदा खरेदी करण्यासाठी आपल्याकडे आले असतील किंवा येतील त्यामुळे सर्वांनी सावध रहावे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्यभरातील शेकडो व्हाॅट्सअप ग्रुपच्या माध्यमातून व फेसबुकच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाफेड कांदा खरेदीचा भाव रोज उपलब्ध करून दिला जात आहे. त्याकडे बारकाईने लक्ष ठेवा आणि आपल्या आजुबाजूच्या, आपल्या गावातील, आपल्या परिचयातील कांदा उत्पादकांनाही नाफेड कांदा खरेदीच्या भावाची माहिती देत जा कोणीही दलाल किंवा मध्यस्थ किंवा खाजगी कंपन्यांचे एजंट यांच्याकडून आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. नाफेडचे अधिकृत कांदा खरेदी केंद्रे सोडून इतर कोणालाही आपल्या शेतीचा सातबारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स देऊ नका असेही दिघोळे यांनी सांगितले.