नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून राज्यातील राज्यातील ३ लाख ३६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६५.९९ कोटींचे कांदा अनुदान जमा होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
आज नाशिकरोड रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर येथील उपस्थित माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आज राज्याच्या पणन विभागाचे सह सचिव डॉ.सुग्रीव धपाटे यांच्याशी कांदा अनुदानाबाबत चर्चा करून अनुदान वितरण करण्याबाबत माहिती घेतली. त्यानुसार ४६५.९९ कोटीची रक्कम वित्त विभागाने पणन विभागाला वर्ग केली आहे.येत्या दोन- तीन दिवसांत राज्यातील ३ लाख ३६ हजार पात्र लाभार्त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ते पुढे म्हणाले की, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा शासनाने यापूर्वीच निर्णय घेतलेला होता. राज्यातील सुमारे ३ लाख ३६ हजार ४०० शेतकऱ्यांसाठी ८४४ कोटी रुपये अनुदान अपेक्षित होते. त्यापैकी पुरवणी अर्थसंकल्पात ५५० कोटीची मागणी मंजूर करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, वित्त विभागाने ४६५.९९ कोटींचा निधी वितरित केला आहे. अजूनही ३७८ कोटी निधी आवश्यक आहे.
उर्वरित निधी लवकरच आकस्मिक खर्चातून किंवा डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पातून दिला जाईल. एकटया नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर १ लाख ७२ हजार शेतकऱ्यांसाठी ४३५ कोटी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, कांदा विक्री केलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन हप्त्यामध्ये हे पैसे दिले जाणार आहे. शासनाचा सर्वांना प्रमाणात अनुदान देण्याचा विचार आहे. म्हणजे लहान-लहान शेतकऱ्यांना एकाच हप्त्यात संपूर्ण लाभ मिळेल.
येवल्यात नाफेड कांदा खरेदी सुरू करण्याचे निर्देश
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात नाफेड संस्थेच्या वतीने कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये येवला तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांना कांदा विक्री करण्यात यावा यासाठी येवल्यात नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत नाफेडचे अधिकारी निखिल पाडाडे यांच्याशी चर्चा करून सूचना केल्या आहे.
kanda anudan