मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याचे दर रोजच घसरत असून घसरणा-या दरामुळे शेतक-याच्या उत्पादन खर्च सुध्दा वसूल होत नसल्याने कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये दर मिळावा यामागणी साठी मनमाड येथे महाविकास आघाडीतर्फे मनमाड-चांदवड रस्त्यावर बाजार समिती गेट समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर कांदा ओतण्यात आला. कांद्याला भाव मिळावा, निर्यात बंदी उठवावी, खतांच्या किंमती कमी कराव्या अशा विविध मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झालेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे मनमाड-चांदवड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात महाविकास आघाडी मधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना(ठाकरे गट) सहभागी झाले होते.