लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याचे भाव कोसळल्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव पाडले. लासलगावसह देशांतर्गत कांद्याची मोठी आवक विक्रीसाठी दाखल होत असल्याने लासलगाव बाजार समितीत गेल्या दहा दिवसात कांद्याच्या बाजारभावात पंचवीसशे रुपयांची मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे सरासरी बाजार भाव सोळाशे ते सतराशे रुपये पर्यंत कोसळल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहे. त्यामुळे आज शेतक-यांनी कांद्याचे लिलाव बंद पडून आपला निषेध व्यक्त केला.
कांदा निर्यातीवर असलेले २० टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करत विक्री झालेल्या कांद्याला एक हजार ते दोन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी यावेळी या संतप्त शेतकऱ्यांनी केली. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात ८०० वाहनातून कांद्याची आवक दाखल झाली. या कांद्याला जास्तीतजास्त २५०१ रुपये, कमीतकमी ७०० रुपये तर सरासरी १७०० रुपये मिळाला प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाल्यामुळे दररोज कांद्याच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
लासलगावसह जिल्हयात इतर ठिकाणीही शेतकरी संतप्त झाले असून ते आंदोलन करत आहे.