अजय सोनवणे, मनमाड
चाळीत साठविलेला कांदा उष्णतेमुळे अनेक वेळा खराब होतो. त्यामुळे शेतक-याला बराच कांदा उकिरड्यावर फेकून द्यावा लागतो. शेतक-यांच होणारे हे नुकसान टाळण्यासाठी नाशिक जिल्हयातील देवळा तालूक्यातील सावकी येथील तरुण शेतक-याने थेट चाळीतच सेन्सर मशिन बसवत आधुनिक तंत्राचा वापर केला आहे. या चाळीत त्याने सेन्सरची उपकरणे ठेवली असून कांद्याच्या आद्रते बाबत तसेच अमोनिया व इतर वायुंच्या आधारे कांदा कुठल्या भागात खराब होतो ते या सेन्सरच्या माध्यमातून समजते. त्यामुळे त्या भागातील खराब कांदा बाजूला काढून इतर कांदा खराब होण्यापासून वाचविता येतो. पाटील कुटुंबाने साठ फुट चाळीत जवळपास चारशे ते साडेचारशे क्विंटल कांदा साठविला असून त्यात सेन्सरचे दहा युनिट बसविले आहे. त्यामुळे कांदा सडतो आहे की खराब होतो. हे कांद्याच्या मध्ये पाईपव्दारे सोडलेल्या सेन्सरच्या मदतीने कळते. यासाठी गोदाम इनोव्हेशन या कंपनीच्या सहकार्याने ही सिस्टिम बसविण्यात आल्याचे शेतकरी सांगतात. त्यांची ही सेन्सर सिस्टिम पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी कांदा चाळीला भेट देत आहे.