श्रीरामपूर – देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी सर्वाधिक कांदा महाराष्ट्र मध्ये पिकवले जातो परंतु बाजार समित्यांमध्ये कांदा विक्रीच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांनी स्वतःची थेट कांदा विक्री व्यवस्था निर्माण केल्यास भविष्यात कांदा उत्पादनातून आर्थिक सक्षम होणे शक्य होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले ते काल तालुक्यातील माळवाडगाव येथे कांदा उत्पादक शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवराम शिंदे (सर) हे होते.
दिघोळे पुढे म्हणाले की देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण होण्यास आलेले असतांना अजूनही कांद्याचे राष्ट्रीय धोरण ठरलेले नसून केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी कांद्याचे निर्यात – आयातीचे धोरण हे ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच राबवले जाते. त्यामुळे थोडेफार कांद्याचे बाजार भाव वाढले तरी केंद्र सरकार तात्काळ कांद्यावर निर्यातबंदी करून बाजार भाव पाडण्याचे काम करत असते. आता महाराष्ट्रसह देशातील कांदा उत्पादकांना संघटित करून कांद्याचे ठोस असे राष्ट्रीय धोरण ठरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून लढा उभारला जात आहे.
कांदा उत्पादित झाल्यानंतर शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये कांदा विक्रीची व्यवस्था आहे. ग्राहकांच्या घरांमध्ये कांदा पोहोचेपर्यंत शेतकरी ते ग्राहक यामध्ये खूप मोठी साखळी असल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बाजार भावापेक्षा दलाल, व्यापारी, आडते, किरकोळ विक्रेते व इतर घटकांनाच कांद्यातून बक्कळ कमाई होते. मात्र कांद्याचे उत्पादन घेणारा शेतकरी नफा कमवण्यापासून वंचितच राहतो. आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून यापुढील काळात थेट शेतकरी ते ग्राहक या पद्धतीने कांदा विक्री व्यवस्था उभी केली जाणार आहे. कांदा उत्पादकांना कांदा विक्रीच्या बाबतीत स्वावलंबी करण्यासाठी संपूर्ण राज्याचा कांदा उत्पादनाची व कांदा उत्पादकांची आकडेवारी संकलित करून राज्यात, देशात व परदेशात संघटनेच्या माध्यमातून थेट कांदा विक्री सुरू केली जाणार आहे. या संवाद मेळाव्यास माळवाडगावसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.