श्रीगोंदा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– श्रीगोंदा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ते संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
श्रीगोंदा येथे शेतकरी मेळाव्यात ही घटना घडली. यावेळी मेळाव्यात कांद्यावर बोलण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांचे भाषण सुरु असतांना काही कार्यकर्ते हातात कांद्याची माळ घेऊन आले होते. त्यावेळी एका कार्यकर्त्यांने हातातील कांद्याची माळ गरागरा फिरवत अजित पवारांकडे फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच तेथील एकाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला रोखले. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि तालुका अध्यक्ष नाना शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात कांद्या प्रश्नांवर एकही शब्द न बोलल्याने भाषणाच्या शेवटी ही कांद्याची माळ फेकण्याचा प्रय़त्न करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच लातूरमध्ये अजित पवार गटाचे सूरज चव्हाण याने संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण केली होती. त्यामुळे तो राग होताच. त्यात आज ही घटना घडली.