इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्लीत नाशिकच्या तिन्ही खासदारांनी भेट घेतली. या भेटीत त्यांना कांदा प्रश्नांवर निवेदन देण्यात आले. यावेळी नाशिकचे खासदार राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे, दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे सर व मालेगाव धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सौ. शोभाताई बच्छाव हे उपस्थित होते.
या भेटीबाबत खा. राजाभाऊ वाजे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्र्यांना सांगण्यात आले. या वर्षी समाधानकारक पावसामुळे कांद्याचं उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक होणार आहे. ऑगस्टपासून विशेषतः दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे. परिणामी देशांतर्गत बाजारावर ताण येऊन दर घसरण्याचा धोका आहे.
ही परिस्थिती शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून, योग्य वेळी निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून कांदा निर्यातीवरील शुल्क ५ टक्के पर्यंत मर्यादित करावे, निर्यातदारांना ७ टक्के पर्यंत मालवाहतूक अनुदान द्यावे, अशा दोन ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.यामुळे देशांतर्गत अतिरिक्त पुरवठ्याचा ताण हलका होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा न्याय्य दर मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. सरकारने वेळेत पावले उचलल्यास शेतकऱ्यांचा हमीभाव अबाधित राहून उत्पन्नावर घाव बसणार नाही. हाच या मागणीमागचा मुख्य उद्देश असल्याचेही खा. वाजे यांनी सांगितले.