नाशिक – वेगवेगळ्या फेसबुक ग्रुप मध्ये व्हाट्सअप ग्रुप मध्ये युट्युब चॅनलवरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बोगस कांदा बियाणे विक्री करणाऱ्या भामट्यांचा याही वर्षी मोठ्या प्रमाणात सूळसुळाट झालेला आहे. त्यामुळे कांदा बियाण्यामध्ये फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले आहे. आमच्याकडे खात्रीशीर कांदा बियाणे मिळेल अशी जाहिरात करणाऱ्यांना हे नक्की विचारा त्यांचे पूर्ण नाव पूर्ण पत्ता मोबाईल नंबर एकूण विक्रीसाठी बियाणे किती आहे. त्यांच्या बियाण्याचा किलोचा भाव किती आहे. तसेच मागील वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांना कांदा बियाणे दिले होते. त्यातील काही मोजक्या ५-१० शेतकऱ्यांचे नाव पत्ता व मोबाईल नंबर कांदा बियाणे खरेदी पूर्वी माहिती करून घ्या. तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर रोखीने व्यवहार न करता ऑनलाईन किंवा बँकेच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करा मगच कांदा बियाणे घ्या असेही त्यांनी सांगितले आहे.
दिघोळे म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनो मागील वर्षी असंख्य शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त बोगस कांदा बियाणे मिळाले या एका कारणामुळे शेतकरी बांधवांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सातत्याने कांदा बियाणे मध्ये शेतकऱ्यांनी स्वतः साठी लागणारे लाल व उन्हाळी कांद्याचे बियाणे स्वतः घरीच तयार करावे. यासाठी राज्यव्यापी मोहीम चालवली होती. त्या माध्यमातून आज असंख्य कांदा उत्पादक शेतकरी बांधवांकडे घरचेच स्वतःचे कांदा बियाणे तयार आहे. परंतु खराब हवामान, गारपीट अवेळी आलेला पाऊस तर काही भागांमध्ये विविध रोगांना बळी पडल्याने कांद्याचे बियाणे प्लॉट खराब झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना कांदा बियाणे कमी उत्पादन झालेले असल्याने यावर्षी लाल व उन्हाळी कांद्याचे बियाणे खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे ही खरेदी करत असतांना सावध राहा.