सुदर्शन सारडा, ओझर
नाफेडसाठी कांदा खरेदी सुरू करत असून सदर नाफेडचा कांदा साठवणूक करण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथील साईलो वाईनचे संचालक विश्वासराव माधवराव मोरे यांच्या मालकीचे सोळा गोडाऊन बुकिंग करून प्रत्यक्षात कांद्याची साठवणूक न करता आणि भाडे रक्कमही न देता फसवणूक केल्याप्रकरणी संजय शिंदे यांच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर पिंपळगाव पोलीस ठाण्यात संजय शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, साधारण चार-पाच महिन्यापूर्वी मार्च एप्रिल महिन्यात संजय शिंदे नामक व्यक्तीने विश्वासराव मोरे यांच्या कांदा गोडाऊन बाबत चौकशी केली. त्यानंतर नाफेडने खरेदी केलेला कांदा साठवणूक करण्यासाठी गोडाऊन भाडेतत्वावर पाहिजे असे सांगून आपण नाफेडचे प्रतिनिधी असल्याचे भासविले. यावेळी विश्वासराव मोरे यांचे सोळा गोडाऊन बुकिंग केले. गोडाऊनचे भाडे आठ लाख रुपये ठरले. त्यातील तीन लाख रुपये आगाऊ म्हणून विश्वासराव मोरे यांच्या बँक खात्यावर जमा केले. त्यानंतर सोळा गोडाऊन पैकी फक्त तीन गोडाऊन मध्ये कांदा साठविला. मात्र, आठ,पंधरा दिवसातच तीनही गोडाऊन मधील कांदा बाहेर नेण्यात आला. आता एकही गोडाऊन भरायचे नाही असे संजय शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान या प्रकरणात संशय आल्यामुळे विश्वासराव मोरे यांनी नाफेडकडे विचारणा केली असता संजय शिंदे आमचा प्रतिनिधी नाही. त्याचा व आमचा काहीही आर्थिक संबंध नाही असे लेखी पत्र नाफेडने विश्वास मोरे यांना दिले. त्यामुळे विश्वासराव मोरे यांनी आपले बँक खाते तपासून तीन लाख रूपये नेमके कोणत्या खात्यातून आले याची खात्री केली असता सदर तीन लाख रुपये संजय शिंदे संचालक असलेल्या फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या खात्यातून आल्याचे निष्पन्न झाले. त्यातच नाफेडचा कांदा खरेदी व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता. प्रत्यक्ष कांदा खरेदी न करता बनावट बिलाद्वारे भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा देश पातळीवर सुरू होती. त्याबाबत चौकशी पण सुरू झाली होती म्हणूनच या प्रकारामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज आला. विश्वासराव मोरे यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार अर्ज दाखल केला मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यासाठी तीन ते चार महिने विलंब करत आरोपीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलिसांवर काही राजकीय दबाव आहे का म्हणून विश्वासराव मोरे यांनी पंतप्रधान कार्यालय, ईडी, सीबीआय, मुख्यमंत्री, गृहमंत्रालय, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केले. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर प्रचंड कांदा घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे
सखोल चौकशी व्हावी
संजय शिंदे नामक व्यक्ती पाच ते सहा प्रोड्यूसर कंपनीवर संचालक असून या व्यतिरिक्त राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) व इतर कांदा व्यापारी संघटनांशी संबंधित असून प्रत्यक्ष कांदा खरेदी न करता शेतकरी व नाफेड यांची फसवणूक व दिशाभूल केली जात आहे तसेच नाफेडच्या निधीचा अपहार केला असल्याचा संशय आहे याबाबत संजय शिंदे यांच्याशी संबंधित सर्व प्रोड्यूसर कंपन्या व इतर संस्थांचे व्यवहार सखोलपणे तपासून भ्रष्टाचाराचे मुळ शोधावे.
विश्वासराव माधवराव मोरे
संचालक, सायलो वाइन प्रकल्प
पिंपळगाव बसवंत