नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते खरीप, लेट खरीप व रब्बी अशा एकूण तीन हंगामात महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी कांदा बियाण्यापासून तर कांदा विक्रीपर्यंत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कांद्या संदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कांदा उत्पादक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत एक विशेष बैठक आयोजित करावी, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले आहे. संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे यांच्या सहीने हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला २५ सप्टेंबर रोजी ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे.
या बैठकीच्या मागणीच्या पत्रातील मजकूर असे आहे. देशातील सर्वाधिक कांदा आपल्या महाराष्ट्रात पिकविला जातो. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला दरवर्षी नियमितपणे उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा बाजारभाव मिळवण्यासाठी देशांतर्गत बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठेत सातत्यपूर्ण कांदा पोहोचणे गरजेचे आहे. कांदा बियाणे पासून तर कांदा विक्रीपर्यंत राज्य सरकारकडून कायमस्वरूपी निश्चित कांदा धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे.
त्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडे अतिशय महत्त्वाच्या संकल्पना,सुचना आहेत. त्या प्रत्यक्षात अंमलात आणल्यानंतर कांदा प्रश्न हा शेतकऱ्यांसाठी, ग्राहकांसाठी व सरकारसाठी निश्चितच सुलभ होईल. याकरिता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे साहेब यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला आपली भेट घ्यावयाची आहे. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अध्यक्षतेखाली बैठकीसाठी आपण वेळ द्यावी ही सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती आपला नम्र जयदीप भदाणे राज्य कोर कमिटी सदस्य तथा नाशिक जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना असे पत्रात म्हटले आहे.