पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून कांद्याची खरेदी करत कांद्याचे भाव वाढले की तो कांदा बाजारात आणत कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवले जातात. या उद्देशाने यंदा पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता. पण या कांद्या खरेदीत घोटाळा झाल्याची तक्रार येवल्यातील शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली. २०१७ पासून आतापर्यंत अडीच हजार कोटी रुपयांचा घोटाळा कांदा खरेदीतून झाला असल्याचे सांगत २४ प्रश्न उपस्थित केले.
आता या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आणि नाफेडच्या वरिष्ठ अधिकारी विना कुमारी, विनय कुमार हे अधिकारी थेट नाफेडच्या पिंपळगाव बसवंत येथील कार्यालयात दाखल झाले. त्यांनी तक्रारदार शेतकरी गोरख संत तर पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधानांच्या सभेत थेट प्रश्न करणारा किरण सानप यांच्याशी तब्बल ४० मिनिटे संवाद साधला. यावेळी तक्रारी बाबत पुरावे ही मागितले शेतकरी संवादानंतर माध्यम प्रतिनिधी आल्याची माहिती मिळतात नाफेडचे चौकशीसाठी आलेले अधिकारी यांनी काढता पाय घेतल्याने नाफेडच्या कांदा घोटाळ्यासह या चौकशीबाबतही तक्रारदार शेतकरी गोरख संत याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.