नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद व्यंकटेश जोशी यांनी भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ (एनसीसीएफ) आणि भारतीय राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन संघ (नाफेड) च्या नवी दिल्ली इथे विक्रीसाठी तैनात मोबाईल व्हॅन्सना हिरवा झेंडा दाखवून कांद्याच्या किरकोळ विक्रीचा प्रारंभ केला.
ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत जीवनावश्यक भाजी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी राखीव साठ्यामधून अचूक मोजमाप केलेला निवडक कांदा जारी करण्याची सुरुवात या कार्यक्रमात झाली.प्रसारमाध्यमांना संबोधित करताना जोशी म्हणाले की,अन्नधान्य चलनफुगवट्याचा दर नियंत्रणात ठेवण्याला केंद्र सरकारचे प्राधान्य आहे आणि मागील महिन्यात चलनफुगवट्याचा दर खाली आणण्यात किमती स्थिरीकरणाच्या उपायांद्वारे करण्यात आलेल्या थेट हस्तक्षेपांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
“आपल्याकडे रब्बी पिकामधील 4.7 लाख टन कांद्याचा राखीव साठा उपलब्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या किमती स्थिरीकरण निधीचा उद्देश जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात तेव्हा बाजारात हस्तक्षेप करणे हा आहे,” असे सांगून जोशी म्हणाले की, कांद्याच्या किरकोळ विक्रीमुळे देशभरातील ग्राहकांना दिलासा मिळेल.राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणणे हा केंद्र सरकारच्या अन्न महागाई नियंत्रित करण्याच्या आणि स्थिर किंमत व्यवस्था राखण्याच्या प्रयत्नांचा अविभाज्य भाग आहे.
एनसीसीएफ आणि नाफेडच्या मोबाईल व्हॅन्स आणि आऊटलेट्स , ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि केंद्रीय भंडार आणि सफल च्या आऊटलेट्सद्वारे प्रमुख ग्राहक केंद्रांमध्ये किरकोळ विक्रीतून कांदा बाजारात आणायला सुरुवात झाली आहे.कांद्याच्या दरानुसार कांद्याचे प्रमाण आणि विक्रीचे मार्ग वाढवले जातील,अधिक तीव्र आणि वैविध्यपूर्ण केले जातील. केंद्र सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग, देशभरातील 550 केंद्रांवरून नोंद केल्या जाणाऱ्या कांद्यासह 38 जिन्नसांच्या दैनंदिन किमतींवर लक्ष ठेवून आहे.राखीव साठ्यामधून कांदा बाजारात आणण्याचे प्रमाण आणि स्थान याबाबत निर्णय घेण्यात दैनंदिन किमतीचा डेटा आणि तुलनात्मक कल मुख्य भूमिका बजावतात.
विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या 3.0 लाख टन कांदा खरेदीच्या तुलनेत, यंदा एनसीसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून दर स्थिरीकरणासाठी बफर (साठवणी) म्हणून रब्बी हंगामात 4.7 लाख टन कांदा खरेदी झाली. महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील प्रमुख रब्बी कांदा उत्पादक क्षेत्रातील शेतकरी/शेतकरी महासंघांकडून कांदा खरेदी करण्यात आला असून कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले.कांद्याची खरेदी, साठवणूक आणि विल्हेवाट या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर या वर्षी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देखरेख ठेवण्यात आली. त्यासाठी एकात्मिक प्रणाली चा अवलंब करण्यात आला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला.मंडी मॉडेल (घाऊक बाजार) दर 1,230 ते 2,578 रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले. गेल्या वर्षी ते 693 ते 1,205 रुपये प्रति क्विंटल इतके होते. त्याच प्रमाणे यंदा सरासरी बफर खरेदी दर 2,833 रुपये प्रतिक्विंटल होता. गेल्या वर्षी तो 1,724 रुपये प्रतिक्विंटल इतका होता. बफरसाठी साठवणूक योग्य कांदा खरेदी केला जात असल्यामुळे, कांद्याचे खरेदी दर नेहमीच्या बाजार भावापेक्षा जास्त राहिले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत 26 ऑगस्ट 2024 पर्यंत खरिपाच्या पेरणी क्षेत्रात 102% वाढ झाल्यामुळे येत्या काही महिन्यांत कांद्याची उपलब्धता आणि दर याबाबत सकारात्मक अंदाज वर्तवला जात आहे.कृषी विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार 26 ऑगस्ट 2024 पर्यंत 2.90 लाख हेक्टर क्षेत्र खरीपातील कांदा पिकाखाली आले. गेल्या वर्षी याच कालावधीत ते 1.94 लाख हेक्टर इतके होते. तसेच सुमारे 38 लाख टन कांद्याचा साठा अद्याप शेतकरी व व्यापाऱ्यांकडे शिल्लक असल्याची माहिती आहे.
ग्राहक आणि शेतकरी या दोघांचे हित लक्षात घेता,आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभाग कांदा पिकाची उपलब्धता आणि दर,यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्या अनुषंगाने, ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध करून देताना शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळावा यासाठी सरकार आवश्यक त्या उपाययोजना करणार आहे.
दिल्ली एनसीआर आणि मुंबईत आजपासून कांद्याची किरकोळ लिलाव प्रक्रिया सुरू होत आहे.त्यानंतर पुढील आठवडाभरात कोलकाता, गुवाहाटी, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद, रायपूर आणि भुवनेश्वर या शहरांचा यात समावेश केला जाईल.सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत देशभरात ही प्रक्रिया राबवली जाईल. भारतातील इतर सहकारी संस्था आणि मोठ्या किरकोळ साखळ्या यांच्याशी संस्थेचे करार सुरु आहेत.