नाशिक – बांगलादेशमध्ये लॉकडाउन लागलेले आहे तरीसुद्धा भारतातून होणारी कांद्याची निर्यात बांगलादेशमध्ये आजही सूरूच आहे. पाकिस्तानच्या कांद्याची भारतीय कांद्यासोबत स्पर्धा आहे. परंतु भारतीय कांद्याची उत्कृष्ट चव व त्याचबरोबर भारतीय कांद्याची निर्यात करणाऱ्या निर्यातदारांनी व्यवहारातील विश्वासाहर्ता बांगलादेश, श्रीलंका, दुबईसह अन्य देशातील आयातदारांना परवडणारी आहे. बांगलादेशमध्ये रस्ता वाहतुकीने भारतीय कांदा तात्काळ व सातत्याने पोहचण्याची असलेली हमी तसेच श्रीलंकेमध्ये पाकिस्तानच्या कांद्यापेक्षा भारतीय कांदा कमी कालावधीत पोहचत असल्याने भारतीय कांद्याला चांगलीच मागणी असल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले.
आपला देशच आपल्या कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ
भारतीय कांद्याला जगाच्या पाठीवर सर्वात मोठी बाजारपेठ ही आपला स्वतःचाच देश असून देशामध्ये एकूण कांदा उत्पादनाच्या ८० ते ८५ टक्के कांदा भारतामध्येच दरवर्षी लागतो आणि एकूण कांदा उत्पादनाच्या ९ ते १८ टक्के कांदा हा निर्यात होत असतो आपल्या देशात आपल्या कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
कांदा उत्पादकांनी घाबरून न जाता संपूर्ण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यांमध्ये आपल्याकडे साठवलेल्या कांद्याच्या विक्रीचे नियोजन करावयाचे आहे. आपापल्या कांदाचाळींमधील कांद्याची टिकवण क्षमता बघून थोडा फार खराब होण्याची शक्यता असलेला कांदा विक्री करून अतिशय उत्कृष्ट टिकायला चांगला असलेला कांदा पुढील चार महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने विक्री करायचे असेही दिघोळे यांनी सांगितले.
घाबरून गेल्यास होणार लूट
कांद्या संदर्भात न्यूज चॅनेल, कुठल्याही दैनिकात व कुठल्याही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या माहितीच्या आधारावर कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये घबराट निर्माण होते व त्यामुळे शेतकऱ्यांकडून जागेवर कांदा खरेदी करणारे किंवा बाजार समितीमध्ये व्यापारी कमी भावात कांदा खरेदी करतात. कांदा उत्पादकांनो अफवांना बळी पडू नका व आपल्या कांद्याची अतिशय चांगली निवड व प्रतवारी करून बाजार समितीमध्ये टप्याटप्याने कांदा विक्रीसाठी घेऊन जा असे आवाहनही दिघोळे यांनी केले.