इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून ना केंद्र सरकार याकडे लक्ष द्यायला तयार आहे ना राज्य सरकार! अशात शेतकऱ्यांनी कोणाकडे भाव मागायचा? की मातीमोल भावाने कांदा विकायचा ? असा प्रश्न करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली असली तरी सरकारचे निर्यातीचे नियोजन नसल्याने तसेच उदासीन धोरण असल्यानेच कांद्याचे दर पडले आहेत. कांद्याला सद्याला मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्याची मोठी पिळवणूक होत आहे.
तरी सरकारने त्वरित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. तसेच कांदा चाळ अनुदान, ठिबक अनुदान मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे अनुदानात वाढ करावी आणि कांदा चाळ योजना प्रभावीपणे राबवावी अशी मागणी केली आहे.