मालेगाव – महाराष्ट्रातील प्रसिध्द कवी कमलाकर देसले उर्फ आबा यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने शुक्रवारी रात्री निधन झाले. सायंकाळी अचानक छातीत त्रास झाल्यामुळे त्यांना सटाणा रोडवरील संकल्प हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करण्यात आले होते. उपचार सुरु असतांनाच त्यांच्या निधनाची बातमी आली. शनिवारी सकाळी ११ वाजता झोडगे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कमलाकर देसले यांचे मालेगाव – धुळे रस्त्यावरील झोडगे हे गाव असून येथील जनता विद्यालयात अनेक दशके त्यांनी अद्यापन केले. कविता व विशेषतः गझल प्रकारावर त्यांची विशेष हुकूमत होती. त्यांच्या कविता मराठी रसिकांच्या मनात घर करत. ज्येष्ठ कवी खलील मोमीन व कमलाकर देसले यांचा पत्राद्वारे साहित्य संवाद यावर आधारित पुस्तक महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. अनेक साहित्य संमेलनात त्यांनी सहभाग घेतला. विविध ग्रामीण संमेलनात अध्यक्षपद, कवी संमेलन अध्यक्ष, सूत्र संचालक, मार्गदर्शक अशा भूमिका त्यांनी पार पाडल्या. आबा या नावाने ते महाराष्ट्र भर परिचित होते. अभंग निरूपण व पसायदान सादरीकरण ही त्यांची विशेष ओळख होती. त्यांची आई व स्त्री जीवनावर आधारीत लिहिलेल्या कविता अनेकांच्या डोळ्यातून पाणी आणत. त्यांचा आवाजही सुंदर होता. त्यामुळे ते त्यांच्या कवितांना चाल लावून ते स्वत. आपल्या आवाजात गात असे.
…….
आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पहिजे…
गौतम संचेती
आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पहिजे…
आहे त्यात थोडं वेगळं बघता आलं पाहिजे…
सूर्य तर रोज उगवतो…
आम्ही त्याला रोज बघतो असं म्हणून कसं चालेल…
प्रकाशाचं देण तसं देता आलं पाहिजे…
आयुष्यात थोड वेगळं जगता आलं पाहिजे…
असे सांगणारा मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील कवी कमलाकर देसलेचे यांचे आज निधन झाले.
अपंगावर मात करून प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून थेट महाराष्ट्रातील नामवंत कवीच्या पंगतीत असलेला कवी कमलाकर देसले यांचा परिचय तसा नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्याला नवा नाही. या कवीच्या गेय कविता, गझल, भजनांनी सर्वांना वेड लावले. दहावीत चार वेळा नापास होऊनही शिक्षणाची जिद्द त्याने सोडली नाही आणि बघता बघता त्याने ‘एमए, बीएड’ही केले. ज्या शाळेत शिपाई म्हणून नऊ वर्षे काम केले, त्याच झोडग्याच्या जनता विद्यालयात तो शिक्षक झाला.
सहा भावडांत वडीलभाऊ असलेल्या कमलाकरला वैयक्तिक आयुष्यातही खूप संघर्ष करावा लागला. वडील शिवणकाम करत असल्यामुळे त्यांच्या मदतीला तो धावला. हळूहळू रेडीमेड कपड्याच्या दुकानासाठी कपडे शिवण्याचे काम त्याने अल्पमजुरीत केले. त्यानंतर तो शाळेत शिपाई म्हणून लागला आणि काम करत असतानाच बीए झाला. नाईट शिफ्ट घेऊन त्याने बीएडही पूर्ण केले. नंतर मनमाडमध्ये मराठीमधून एमए केले.
खरं तर कमलाकर एका कवितेत म्हणतो…
का कुणाचा चालवू मी वारसा…
सर्व येणे लाभते सर्वांकडे…
रूप देखावा हवा पण आरसा….
असं असलं तरी त्याच्या आईच्या जात्यावरच्या कवितेने त्याला घडवले… त्याच्या मनात तयार झालेल्या अनेक कवितांवर आईच्या जात्यावरील कवितेच्या लयीचा प्रभाव दिसतो. त्याच्या चाली आणि खिळवून ठेवणारा आवाज सर्वांना मंत्रमुग्ध करतो. त्याच्या या यशात आईचा वाटाही मोठा आहे. तर दुसरीकडे वडिलांना असलेल्या वाचनाच्या आवडीमुळे त्याने मराठी साहित्याचाही सखोल अभ्यास केला.
झोडगासारख्या एका खेडेगावात हा शिक्षक मराठी आणि कार्यानुभव हे विषय शिकवतो. शाळेतील गतिमंचासाठी तो स्वत:च गाणी लिहितो. हामोर्नियमच्या साथीने मुलांना तो तल्लीनतेने शिकवतो. त्याची कविता, त्याची वाचनाची ओढ, अपंगत्वावर त्याने केलेली मात, त्याच्या कुटुंबासाठीच्या तळमळीमुळे पुण्याच्या एका संस्थेने त्याला ‘जिद्द’ हा राष्ट्रीय पुरस्कार दिला. या पुरस्कारापूर्वी कमलाकरला मिळालेल्या पुरस्कारांची यादी पाहिली; तर त्याचे साहित्यातील स्थान लक्षात येते. साहित्य प्रबोधन पुरस्कार, कवी गोविंद पुरस्कार, मुक्ताई काव्य पुरस्कार, समता काव्य यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आले आहे.
अशा या जिद्दी कवीच्या आईच्या कवितेतील ओळी कमलाकरमुळे नेहमी डोळ्यात पाणी आणेल….
सोस… सोसता… सोसता..
तुला हसू कसे आले…
शिशिरातला वसंत कसा पांघरता आले…
मर… मरता… मराता कशी जगणं शिकले…
तुला छळताना सांग कसे दु:खच थकले….