नवी दिल्ली – केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयातर्फे गुरुवार (२६ ऑगस्ट) पासून ई-श्रम पोर्टलला सुरुवात होत आहे. या पोर्टलमुळे जवळपास ३८ कोटी कामगारांना फायदा होणार आहे. यामध्ये मजुरांसह स्थलांतरित मजूर, रेल्वे कामगार आणि मजूर आणि घरगुती कामगारांचा समावेश आहे.
टोल फ्री क्रमांक जाहीर
कामगारांच्या मदतीसाठी १४४३४ हा राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत कामगारांना एक ई-श्रम कार्ड प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामध्ये १२ आकड्यांचा युनिक क्रमांक असेल. ई-श्रम कार्डद्वारे देशातील कोट्यवधी असंघटित कामगारांना एक नवी ओळख मिळणार आहे. संपूर्ण देशा ई-श्रम कार्ड मान्यताप्राप्त असेल.
असंघटित क्षेत्राचा डाटाबेस तयार करण्यासाठी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. याद्वारे सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांच्या एकत्रिकरणाचा प्रयत्न केला जाणार आहे. कामगारांची माहिती राज्य सरकार आणि विभागांकडूनही जारी केली जाणार आहे. श्रममंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी ई-श्रम पोर्टलचा लोगो प्रसिद्ध केला होता.
डाटाबेसची गरज का
गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाउन लावल्यानंतर मोठ्या प्रमाणात कामगार, मजुरांनी घराकडे स्थलांतर केले होते. कामगारांवर बेरोजगारीचे संकट आले होते. डाटाबेस तयार करण्यासाठी सरकारलाही खूप उशीर झाला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेतही ही समस्या पाहायला मिळाली होती. त्यामुळे लवकर डाटाबेस तयार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले होते.