इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन हे चांगलेच लोकप्रिय आहेत. बरीच वर्षे चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर आता ते देखील ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. कमल हसन यांच्या भरपूर गाजलेल्या ‘इंडियन’ या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटानिमित्ताने दिग्दर्शक शंकर आणि कमल हसन पुन्हा एकत्र काम करत आहेत. विशेष म्हणजे, ‘इंडियन २’ या चित्रपटाचे ओटीटी अधिकार मोठ्या किंमतीला विकले गेले आहेत. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून सध्या पोस्ट-प्रोडक्शनचे काम सुरू आहे.
‘ट्रॅक टॉलीवूड’ संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, कमल हसन यांच्या ‘इंडियन २’या चित्रपटाचे ओटीटी अधिकार नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला तब्बल २०० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. दिग्दर्शक शंकर यांच्यामुळे हे शक्य झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या ‘२.०’ या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ‘२.०’ या चित्रपटाने जगभरातून जवळपास ७०० कोटींची कमाई केली होती.
आधुनिक तंत्राचा वापर
दिग्दर्शक शंकर यांनी या चित्रपटासाठी डी-एजिंग टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. यापूर्वी ‘द आयरिशमॅन’ या चित्रपटात हे तंत्रज्ञान वापरले गेले. या तंत्राद्वारे कलाकाराचे वय कमी दाखवले जाते. भूतकाळातील घटना दाखवण्यासाठी प्रामुख्याने या तंत्राचा वापर केला जातो. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंडियन’ या चित्रपटातील काही कलाकार या नव्या चित्रपटातही असणार आहेत. त्यांना एआयच्या मदतीने ‘इंडियन २’ चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात कमल हसन यांच्या व्यतिरिक्त काजल अग्रवाल, सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंग, बॉबी सिम्हा, समुतिरकनी, विद्युत जामवाला आणि वेनेला किशोर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असतील